स्थायी समिती सभापती पदावरून वाद चव्हाट्यावर; उल्हासनगरात शिवसेना-रिपाइं युतीत फूट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:30 PM2021-04-10T17:30:10+5:302021-04-10T17:30:34+5:30
Ulhasnagar Politics: स्थायी समिती सभापती पदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत उभी फूट पडून उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : स्थायी समिती सभापती पदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत उभी फूट पडून उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले. तशी माहिती स्वतः भालेराव यांनी पत्रकारांना दिली. १५ एप्रिल रोजी होणारी स्थायी समिती सभापती निवडणूक पुढे ढकलली असून त्यावादातून रिपाइं शिवसेना महाआघाडीतुन बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना, दिड वर्षांपूर्वी शिवसेना महाआघाडीने भाजपातील ओमी समर्थक काही नगरसेवकांना फोडून महापौर व उपमहापौर निवडून आणले. महापौर पदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान तर उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले. त्यानंतरच्या स्थायी समिती सभापती, विशेष व प्रभाग समिती सभापती पदे शिवसेना आघाडीकडे आली. दरम्यान महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप समर्थक मात्र साई पक्षाचे समिती सदस्य गजानन शेळके यांना शिवसेना आघाडीने आपल्याकडे घेतल्याने, स्थायी समिती मध्ये शिवसेना आघाडी व भाजपचे प्रत्येकी ८ अशी समसमान मते (सदस्य) झाले. शिवसेना आघाडी कडून रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव सभापती पदासाठी इच्छुक होते.
महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक १५ एप्रिल रोजी तर अर्ज दाखल करण्याची १२ एप्रिल तारीख होती. समिती सदस्यांची फाटाफूट होऊ नये म्हणून, शिवसेना आघाडीने ठाणे जिल्ह्यातील एका फार्म हाऊस मध्ये शिवसेना आघाडीच्या समिती सदस्यांना ठेवले. तर भाजपने पक्षाच्या समिती सदस्यांना गोवा दर्शनासाठी नेले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरविकास विभागाने स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पुढे ढकलली. तसेच सभापती पदासाठी इच्छुक असलेली रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव यांना शिवसेना आघाडीने पद देण्यास नकार दिल्याचे समजते. यातून भालेराव भाजपच्या गोटात गेल्याचे बोलले जाते. भालेराव यांनी भाजपचे नेते व विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन स्थानिक राजकीय परिस्थिती समजून सांगितली. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी देवेन्द्र फडणवीस व भालेराव यांच्या भेटीला दुजोरो दिला.
शिवसेना विकास आघाडी कायम....शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी
शहरातील शिवसेना महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेसह काँग्रेस, रिपाइं, पीआरपी, राष्ट्रवादी पक्षाचा समावेश आहे. त्यापैकी रिपाइंचे भगवान भालेराव हे भाजप गोटात सामिल झाल्याचे समजले. त्यांच्याकडे उपमहापौर पद असताना, स्थायी समिती सभापती पद मागणे उचित नाही. त्यापेक्षा शिवसेना आघाडीला सभापती पद नको. अशी पक्षाची भूमिका असून शिवसेना आघाडी कायम आहे.