कार्यकारिणीत डावलल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजी; कार्यकर्ते घेणार प्रदेशाध्यक्षांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:00 AM2021-03-25T01:00:19+5:302021-03-25T01:00:41+5:30
जिल्हाध्यक्ष व माजी आ. जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कल्याण : राष्ट्रवादीची कल्याण-डोंबिवली जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर झाली. मात्र, या जम्बो कार्यकारिणीत डावलल्याने कार्यकर्त्यांमधील नाराजी उफाळून आली आहे. पडत्या काळात पक्षात इमानेइतबारे काम करूनही न्याय मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करीत असून काहींनी तर थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्याची तयारी केली आहे.
जिल्हाध्यक्ष व माजी आ. जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी २५, सरचिटणीसपदावर १३ जणांची नियुक्ती केली आहे. तर विधानसभानिहाय अध्यक्ष आणि कार्याध्यक्षही जाहीर केले. मंगळवारी पदे जाहीर होताना काहींनी स्थानिक पातळीवर काम न करता प्रदेश पातळीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे दिसून आले. तर काही जणांनी नाराजीमुळे नियुक्तिपत्रकेच घेतली नाहीत. डोंबिवलीतील कार्यकर्ते भाऊ पाटील यांना अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांचीही नाराजी पद वाटपावेळी दिसून आली. कार्यकारिणी बनवताना स्थानिकांना विश्वासात घेतले गेलेले नाही, पक्षविरोधी काम केलेल्यांना पदे वाटली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीविरोधात काहींनी निवडणूक लढविली होती. त्यांनाही पदे वाटल्याकडे कल्याणमधील नाराज कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.
अध्यक्षपद न मिळालेले डोंबिवलीतील कार्यकर्ते भाऊ पाटील हे गुरुवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. डोंबिवलीतील कार्यकर्तेही नाराज असून तेही त्यांची व्यथा वरिष्ठ पातळीवर मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्ते ॲड. ब्रह्मा माळी यांनीदेखील ग्रामीणचे अध्यक्षपद मिळावे म्हणून स्थानिक नेत्यांकडे इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांनाही डावलल्याने ते संबंधित नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.