“सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक, कारण…’’ मोहन भागवतांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 08:46 PM2021-07-04T20:46:14+5:302021-07-04T20:49:18+5:30
Mohan Bhagwat News: सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे विधान केले आहे.
नवी दिल्ली - सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी लिंचिंगमध्ये (Lynching ) सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या (Hindutwa) विरोधात असल्याचे विधान केले आहे. गाझियाबाद येथे मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत मांडले. ("The DNA of all Indians is one, the idea of Hindu-Muslim unity is misleading, because They are not different" Mohan Bhagwat's big statement)
सरसंघचालक या कार्यक्रमात म्हणाले की, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक आहे. कारण ते वेगळे नाहीत तर एक आहेत. पूजा करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. काही कामं अशी असतात जी राजकारणाच्या माध्यमातून होऊ शकत नाहीत. राजकारण लोकांना एकत्र आणू शकत नाही. राजकारण लोकांना एकजूट करण्याचे हत्यार बनू शकत नाही.
या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही गेल्या ४० वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारतीय लोकांचा डीएनए हा एकसारखा आहे. तसेच हिंदू आणि मुसलमान हे दोन समूह नाही आहेत. त्यांना एकजूट करण्यासाठी काही करण्याची गरज नाही, कारण ते आधीपासूनच एकजूट आहेत.
मोहन भागव यांनी सांगितले की, आम्ही एका लोकशाही देशात राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयांचेच वर्चस्व असू शकते. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही आहे. एकतेचा आधार हा राष्ट्रवाद असला पाहिजे.
सरसंघचालक मोहन भागवत राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबाद येथे आयोजित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण करण्यासाठी गेले होते. डॉ. ख्वाजा अहमद यांनी वैचारिक समन्वय एक पहल नावाचे पुस्तक लिहिले आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या या कार्यक्रमात अनेक महत्त्वपूर्ण लोक सहभागी झाले होते.