प्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर…
By प्रविण मरगळे | Published: September 22, 2020 02:23 PM2020-09-22T14:23:13+5:302020-09-22T14:24:32+5:30
मराठा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राज्यात मराठा समाज १६ टक्के आहे पण देशभरात केवळ २ टक्के आहे असं त्यांनी सांगितले.
मुंबई – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, मगच नोकर भरती करा अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या एका स्थगितीमुळे मराठा समाजाने घाबरू नये, कोर्टाचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसीचं म्हणणं आहे आमचं ताट आमच्याकडेच राहू द्या, आमच्या ताटात वाटणी नको, आम्हाला कोणी नको आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावं पण आमच्या ताटातलं मिळू नये, अशी मागणी ओबीसी समाजातून येत असल्याचं सोशल मीडियातून वाचायला मिळत आहे. त्यामुळे सर्व मराठा पुढाऱ्यांना विनंती आहे त्यांनी मराठा आरक्षण गुंतागुंतीचा करू नका, ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये, मराठा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राज्यात मराठा समाज १६ टक्के आहे पण देशभरात केवळ २ टक्के आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशभरातील ओबीसी एकत्र आला तर राज्यात जे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे तेही मिळणार नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक स्थगिती दिली म्हणून घाबरु नका, अंतिम सुनावणीत मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्ट विचारात घेईल. मराठा समाजाच्या बाजूने निकाल देईल. राज्यातील ओबीसींच्या मागणीला देशभरातील ओबीसींनी पाठिंबा दिला तर देशभरात आपलं किती तथ्य होतं हे पाहिलं पाहिजे. सुरळीत चाललेलं आंदोलन, मराठा समाजाची मागणी आणि सुप्रीम कोर्ट जे मान्य करण्याच्या परिस्थितीत आहे यामध्ये कोणीही खोडा घालू नका, ही सगळ्या मराठा लढाऊ कार्यकर्त्यांना विनंती आहे. सल्लागार बरेच असतात पण राजकीय नेत्यांना कानफाटके राहू नये एवढीच माझी विनंती आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरण्यास तयार
ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, या तांत्रिक गोष्टी आहेत, मराठा समाजाला जबरदस्तीने ओबीसीत घालणं योग्य राहणार नाही, मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. जेव्हा मंडल आयोग स्थापन झालं, ते फक्त ओबीसींसाठी होतं. मात्र आयोग लागू करण्यामागे आंबेडकरी चळवळीने महत्त्वाची भूमिका नभावली, रस्त्यावरची लढाईही केली. त्याप्रमाणे मराठा समाजाने हाक दिली तर आम्ही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरु असं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही योग्य आहे ते करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले आहे. पण २०११ च्या जगणनेनुसार ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कमी आहे. पण जर वेळ आली तर ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं.
राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज
मराठा आरक्षणावरील स्थगितीचा अंतरिम आदेश उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सोमवारी विनंती अर्ज दाखल केला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आरक्षण समर्थकांमध्ये नाराजी होती. आता मराठा आरक्षणावर घटनापीठासमोर सुनावणी होईल. तत्पूर्वी सरन्यायाधीशांना घटनापीठ स्थापण्याची विनंती करावी लागेल. घटनापीठ अस्तित्वात आल्यानंतरच सुनावणीस सुरुवात होईल. अद्याप त्यासाठी दिवस ठरलेला नाही.
प्रयत्न सोडणार नाही : मुख्यमंत्री
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी तीव्र पडसाद उमटत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. मराठा समाजाचे आरक्षण कायम राहील यासाठी प्रयत्नांची कुठलीही कसर सोडली जाणार नाही,असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणे ही प्रक्रिया आहे. यावर सुनावणी होईल. मोठे घटनापीठ लवकरात लवकर स्थापन व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चव्हाण यांनी शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये यासंदर्भात चर्चा केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित होते.