‘सामना’मधील भाषा आपणास योग्य वाटते काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:13 AM2021-01-03T06:13:31+5:302021-01-03T06:14:14+5:30
Chandrakant Patil News: भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे संपादक रश्मी ठाकरेंना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय नेते, तसेच महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा आपल्याला योग्य वाटते काय? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरली जाते. वहिनी, आपण सामनाच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापून येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. मी आपणास एक व्यक्ती म्हणून चांगले ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल,’ असे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा, अशी माझी आपणास विनंती आहे. माझी ही विनंती आपणास योग्य वाटत नसेल आणि आपल्या वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल, तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असेही चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. या वृत्तपत्रात आमच्या नेत्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरली जात असून, आपण या बाबत लवकरच रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले होते.