पंतप्रधानांना देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेश निवडणूक जिंकायचीय का?, ‘फाळणी स्मृती दिना’वरून नाना पटोले यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:31 AM2021-08-15T05:31:54+5:302021-08-15T05:32:30+5:30
nana patole : स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
नागपूर : देशाच्या फाळणीचाही स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. हे
मोठे षडयंत्र आहे. फाळणीची मोठी किंमत या देशाने भोगली
आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे ‘जरा याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामतील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, १४ ऑगस्ट
१९४७ राेजी देशाची फाळणी
झाली. त्या दिवशी मोठा रक्तपात झाला. हिंदू-मुस्लिम दंगल झाली. तो स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. अशा दिवसाचाही स्मृतिदिन कुणी पाळेल का? हे मोठे षडयंत्र आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे होत नाही ना, अशी शंका येते.
भाजपने केवळ ओबीसींचेच आरक्षण संपवले असे नाही तर अनुसूचित जाती-जमातीचेही आरक्षण संपवण्याची तयारी केली असल्याचा इशारा पटोले यांनी कार्यक्रमात बोलताना दिला.
महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले ते दिल्लीतील नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. २५ वर्षे हे दोघेही सोबत होते. तेव्हा काही अडचण नव्हती. महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर काँग्रेस गडकरी यांच्या पाठीशी आहे. महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.
कोरोनाच्या रूपात केंद्राने मोठे कांड घडविले
कोरोनाच्या रूपात केंद्राने देशात जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही मोठे कांड घडवून आणले. चीनमधून हा रोग भारतात कसा आला याचे उत्तर अजूनही पंतप्रधान देत नाहीत. कोरोनामध्ये लाखो लोक तडफडून मेले, याला केंद्र जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.