नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार?; 'त्या' विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 09:40 AM2020-12-28T09:40:38+5:302020-12-28T09:46:04+5:30
भाजपनं ६ आमदार फोडल्यानं नितीश कुमार आणि जेडीयू भाजपवर नाराज
पाटना: पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली असून कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी अध्यक्षपदासाठी रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तो मंजूरदेखील झाला. त्यामुळे आता रामचंद्र प्रसाद सिंह संयुक्त जनता दलाचं नेतृत्त्व करतील. पक्षाची धुरा सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं. 'मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मला खुर्चीचा मोह नाही,' असं नितीश कुमार म्हणाले.
I had no desire to become the Chief Minister. I had said that the public had given its mandate and anyone can be made the Chief Minister, BJP could make its own Chief Minister: Bihar CM Nitish Kumar (27.12.2020)
— ANI (@ANI) December 28, 2020
(file photo) pic.twitter.com/yiQsCTXaEw
राज्यसभा खासदार नितीशकुमारांचा नवा राजकीय वारसदार; बिहारच्या राजकारणात खळबळ
जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नितीश यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यांचं मत स्पष्ट केलं. 'भाजपला मुख्यमंत्रिपद हवं असल्याचं लोक म्हणतात. मला त्याची कोणतीही चिंता नाही. मी खुर्चीला, पदाला चिकटून राहणारा नेता नाही. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मी एनडीएकडे माझी इच्छा बोलून दाखवली. पण माझ्यावर इतका दबाव होता की मला पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारून काम सुरू करावं लागलं,' असं नितीश यांनी सांगितलं.
भाजपनं (नंबर)गेम केल्यानं नितीश नाराज; आज शिवसेना स्टाईलनं उत्तर देणार?
जेडीयू-भाजपमधील तणाव वाढला
बिहारमध्ये एनडीएमधील तणाव वाढला आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूच्या सातपैकी सहा खासदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपनं धक्का दिल्यानं जेडीयूनं नाराजी व्यक्त केली. अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेली घटना युतीत असलेल्या दोन पक्षांसाठी चांगली नाही, अशी भावना जेडीयूकडून व्यक्त करण्यात आली होती. अरुणाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडीचा परिणाम बिहारमध्ये होणार नाही, असं जेडीयूनं स्षष्ट करण्यात आलं. मात्र तरीही जेडीयूच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी लपून राहिलेली नाही.