“दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय; विनाकारण छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करु नका”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 08:51 AM2020-09-18T08:51:05+5:302020-09-18T08:53:48+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटेंना फटकारलं
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. मराठा आरक्षण यश, अपयश बघण्यापेक्षा आता समाजाला आरक्षण कसं मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपलं अपयश झाकण्यासाठी जाणुनबुजून आधीच्या सरकारवर खापर फोडलं जात आहे. चुकीच्या बातम्या पसरवल्या जातायेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर केला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीवर आपण अडचणीत येतोय असं वाटल्यावर इतर गोष्टी काढायच्या, चुकीच्या बातम्या पसरवायच्या असं राजकारण केले जात आहे. माजी महाधिवक्ता कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणाची केस लढू नये, हे मी सांगितलं असल्याचा आरोप माझ्यावर झाला. मात्र सोलापूरात मराठा परिषद झाली, त्यामध्ये महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याऐवजी माजी महाधिवक्ता थोरातसाहेब यांनी ही केस चालवावी, असा निर्णय घेण्यात आला. तशाप्रकारची शिफारस सरकारकडे आले, त्यावेळी स्वत: कुंभकोणी माझ्याकडे आले होते. कुंभकोणी यांनी स्वत: माझ्याशी बोलताना सांगितले की, मराठा समाजाचा विश्वासच माझ्यावर नसेल तर मला ते चालवणं कठीण जाईल. तसेच, माझ्यापेक्षा थोरात साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे आपण थोरात यांना ही टीम लीड करायला सांगितली पाहिजे, त्यानंतर ती शिफारस सरकारने मान्य केली. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. थोरात यांच्या टीमनेच उच्च न्यायालयात केस जिंकलेली होती, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले. तसेच आपल्या सरकारचं अपयश झाकण्यासाठी मागच्या सरकारवर आरोप करायचे हे काही नेत्यांना वाटतं. इतकचं नव्हे तर माझी जात ब्राह्मण आहे म्हणून माझ्यावर आरोप करुन संशयाचं वातावरण निर्माण करायचं असंही नेते करतात. पण मराठा समाजासाठी मी काय केले याची जाणीव समाजाला आहे असा गंभीर आरोप फडणवीसांनी सत्ताधारी नेत्यांवर केला.
सध्याच्या परिस्थितीत पोलीस भरती करणं योग्य नाही
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर समाजात असंतोषाची भावना आहे. आताची परिस्थिती पाहता पोलीस भरती करणे हे अयोग्य होतं, राज्यातील परिस्थिती चिघळली असताना ती आणखी चिघळेल अशाप्रकारचा निर्णय सरकारनं टाळला पाहिजे, तो घेणं योग्य नाही. सरकार सर्वोच्च न्यायलयाकडे जाऊन मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याची मागणी करत असेल तर ही भरती पुढे ढकलता येईल असं फडणवीस म्हणाले.
छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडू नका
छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडू नका, दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय आहेत, ज्यावेळी मराठा मोर्चा मुंबईत आला होता. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळाशी सरकारचं बोलणं झालं. सरकारशी चर्चा झाल्यानंतर संभाजीराजेंनी मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर जाऊन सगळे निर्णय सांगितले. स्वत: मी मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा आभार मानताना मी संभाजीराजे आणि उदयनराजेंचे आभार मानले. सातत्याने समाजाला एकवटून हा लढा योग्य तसा होईल यासाठी उदयनराजेंनी प्रयत्न केले आहेत. उदयनराजेंचाही मराठा लढ्यात मोठा वाटा आहे. या दोघांच्या मनातही नेतृत्वाबाबतचा वाद नसेल. त्यामुळे विनाकारण नेतृत्वाचा मुद्दा काढून छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंना फटकारलं आहे.
रविवारी मुंबईभर मराठा समाजाचं आंदोलन
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती आदेशानंतर राज्य सरकारचे निर्णय आणि कृती मराठा समाजाला डिवचणारी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही समाज शांत होता, संयमाने व्यक्त होत होता. तरीही राज्य सरकारने अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबविण्याचा, पोलीस भरतीचा निर्णय घेतला. मराठा विद्यार्थी आणि तरुणांवर अन्याय करण्याची सरकारची भूमिका आहे. आरक्षणासह या सर्व प्रश्नांवर तातडीने योग्य निर्णय न झाल्यास रविवारी मुंबईभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा – विनायक मेटे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले. राज्य सरकार गेल्या ५-६ दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांमध्ये सध्या एकवाक्यता दिसून येत नाही. या एकवाक्यतेसाठी सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केलं होतं.
संभाजीराजेंचा विनायक मेटेंना टोला
मराठा आरक्षणात दुर्दैवाने राजकारण होत आहे. मी मराठा समाजाचा घटक आहे मला नेतृत्व करायचं नाही, जे समाज म्हणेल त्याच्या पाठिशी मी उभा आहे. उदयनराजे असो वा मी छत्रपती घराणे एकच आहे. त्यामुळे विनायक मेटे काय म्हणता याला अर्थ नाही. मी कोणत्याही नेत्याबद्दल भाष्य केले नाही, प्रत्येकाची आपापली भूमिका आहे. २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ज्या कोणी भूमिका बदलल्या त्यांचं त्यांनाच ठाऊक आहे असं सांगत संभाजीराजेंनी टोला लगावला आहे.