“फोन बंद करु नका, काळ कठीण आहे; पहाटे ३ वाजताही कुणी कॉल केला तरी उचला”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 11:24 AM2020-09-15T11:24:18+5:302020-09-15T11:26:01+5:30
सरकारी दराप्रमाणे बिल दिले जातंय का याचीही खातरजमा करा. नागरिकांच्या मदतीसाठी एक विधानसभा एक घर अभियान राबवावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुणे – राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. हा काळ कठीण आहे. सामान्य लोकांना मदतीची आवश्यकता असून प्रत्येक नगरसेवक, भाजपाच्या कार्यकर्त्यांना यात सक्रीय राहिलं पाहिजे. नगरसेवकांनी पहाटे ३ लाही लोकांचे फोन स्वीकारावेत, त्यांनी फोन बंद ठेवता कामा नये अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंदक्रात पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली.
रविवारी रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे यांच्यासह पुणे शहरातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजनसज्ज बेड्स वाढवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालयात बेड्स वाढवणे शक्य नसेल, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे ते वाढत नसतील तर संबंधितांनी पुढे येऊन मदत करावी असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
त्याचसोबत सध्याच्या या कठीण काळात लोकांना ऑक्सिजनयुक्त बेड्ची गरज आहे. त्यांना सर्व ताकदीनिशी मदत करा.शहरात रुग्णवाहिकांची कमतरता आहे. त्यासाठी खासगी कारमध्येही रुग्णवाहिका तयार करा. या गोष्टींना येणारा खर्च भाजपा करेल मात्र लोकांना अडचणी येऊ नयेत याची काळजी घ्या. सर्वसामान्य रुग्ण,ज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांची रुग्णालयातील बिले भरण्यास मदत करा. सरकारी दराप्रमाणे बिल दिले जातंय का याचीही खातरजमा करा. नागरिकांच्या मदतीसाठी एक विधानसभा एक घर अभियान राबवावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठा समाजासाठी आंदोलनाची भूमिका
तत्कालीन भाजपा सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने मराठा समाजाला सुविधा दिल्या पाहिजेत. दीड हजार कोटींच्या सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत भाजपा आंदोलनाची भूमिका घेईल. कार्यकर्त्यांनी आग्रही राहून या आंदोलनात भाग घ्यावा असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्याना केले आहे.