“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 04:35 PM2021-07-08T16:35:22+5:302021-07-08T16:37:23+5:30

Uddhav Thackeray: जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा.

Don't worry about alliance, strengthen Shiv Sena"; Uddhav Thackeray order to the district chief | “युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा

मुंबई – केंद्रात कॅबिनेट विस्तार झाल्यानंतर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्ष बळकट करणासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. खासदार अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांत शिवसंपर्क अभियान सुरू करा. जनतेची काम करा. पक्ष बळकट करा. विधानसभानिहाय, तालुकानिहाय, पंचायतनिहाय पूर्वतयारी आहे. १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

तसेच जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा. प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी आहे. १९६६ पासून आजपर्यंत आपण इथपर्यंत कसं आलोय ते जाणून घ्या, शिवसेनाप्रमुखांचा विचार घराघरात पोहचवण्याचं काम करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा असं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी केले असं अनिल देसाईंनी सांगितले.

शिवसेना नेहमी निवडणुकांना सामोरे जाते. निवडणुकीची तयारी सुरूच असते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. शिवसेनेसाठी स्वबळ म्हणजे पक्ष बळकट करण्याचे आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वबळ वापरलं जातं. जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे महाविकास आघाडीचे तिन्ही नेतृत्व ठरवेल त्यानुसार शिवसैनिक काम करतील असंही अनिल देसाई म्हणाले.

सहकार हा राज्याचा विषय

घटनेप्रमाणे पाहिले तर सहकार हा राज्याचा विषय आहे. सहकाराचे काही पैलू तरतुदी असतात. त्यात केंद्र सरकारची मर्यादित भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या सहकार चळवळीला बळकटी आणण्यासाठी नवा विभाग केला असेल तर चांगले आहे. परंतु दबावापोटी राज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न कराल तर ते घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.   

राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई होऊ नये.

सध्याच्या काळात ईडी, सीबीआय या यंत्रणेचा वापर कसा केला जातोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. एकनाथ खडसेंवरील ईडीची कारवाई होत असेल तर आमचं इतकचं म्हणणं आहे की, राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई होऊ नये असंही अनिल देसाई यांनी सांगितले.

Web Title: Don't worry about alliance, strengthen Shiv Sena"; Uddhav Thackeray order to the district chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.