मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे 'ती' दोन लेकरं आईला मुकली; भाजपा नेते संतापले
By प्रविण मरगळे | Published: October 5, 2020 06:10 PM2020-10-05T18:10:35+5:302020-10-05T18:13:06+5:30
BMC, BJP Kirit Somaiya News: अग्निशमन दल, पोलीस या महिलेचा शोध घेत होते. परंतु सदर महिलेचा मृतदेह पहाटे ३ च्या सुमारास वरळीतील नाल्यात सापडला असं त्यांनी सांगितले.
मुंबई – घाटकोपर असल्फा व्हिलेज येथील एक महिला गटारात पडून वाहून गेली, तिचा मृतदेह हाजी अली समुद्रकिनारी सापडला. या घटनेवरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. गटाराचे काम करणाऱ्या कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
याबाबत किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की, शनिवारी संध्याकाळच्या मुसळधार पाऊस सुरु होता, तेव्हा असल्फा व्हिलेज येथे राहणारी ही महिला गटारात पडून वाहून गेली. त्या गटारांवर पूर्वी सिमेंटचे ढापे बसवलेले होते, परंतु जानेवारीत गटरांचे काम केल्यावर निकृष्ट दर्जाचे ढापे बसवले होते. अग्निशमन दल, पोलीस या महिलेचा शोध घेत होते. परंतु सदर महिलेचा मृतदेह पहाटे ३ च्या सुमारास वरळीतील नाल्यात सापडला असं त्यांनी सांगितले.
तसेच त्या महिलेला २ वर्षाची मुलगी आणि ६ वर्षाचा मुलगा आहे. महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ती दोन लहान लेकरं आईला मुकली आहेत. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. गटाराचे काम करणारा कंत्राटदार व महापालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, या महिलेचा मृत्यूला जबाबदार कोण? या घटनेबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
शीतल दामा असल्फा घाटकोपर महापालिका चा उघड्या गटारीत पडल्या, मृतदेह वरळी त सापडला. ह्या मृत्यूला जवाबदार कोण ?? बी एम सी चे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर वर फौजदारी कारवाई हवी @BJP4Maharashtra@mybmc@Dev_Fadnavispic.twitter.com/4d38yjGu4L
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 5, 2020
काय घडलं होतं?
शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसात घाटकोपर येथील एक महिला गटारात पडली, त्यात ती वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या महिलेचं कुटुंब घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज येथे राहतात. शनिवारी ही महिला आपल्या मुलासह गिरणीमध्ये दळण घेऊन गेल्या होत्या. त्यांनी मुलाला घरी पाठवून दिल आणि दळण दळेपर्यंत त्या गिरणीत उभ्या होत्या. त्यानंतर दळण घेऊन घरी येत असताना संध्याकाळी पाऊस सुरु झाला. रस्त्यावर, चाळीत पाणी भरलं होतं, कुटुंबाने फोन केल्यानंतर त्यांनी पावसामुळे एका ठिकाणी उभी असल्याचं सांगितलं, परंतु त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही.
रात्री उशीरापर्यंत महिला परतली नसल्याने कुटुंबाने पोलीस तक्रार दाखल केली, सकाळी त्यांचा शोध घेणे सुरु झाले, तेव्हा गल्लीत अर्धवट उघडलेल्या गटाराच्या झाकणाच्या बाजूला त्यांची दळणाची पिशवी पडलेली आढळली, हे गटार ४-५ फूट खोल होते, शनिवारी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते, अग्निशमन दल, पालिका कर्मचारी गटारात उतरुन महिलेचा शोध घेत होते, परंतु हाती काहीच लागलं नाही, अखेर सोमवारी सकाळी या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी आढळला.