दक्षिण मुंबईत थेट लढतीमुळे उर्वरित सर्वांचे डिपॉझिट जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:46 PM2019-04-14T23:46:35+5:302019-04-14T23:47:01+5:30
निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांचा आकडा मोठा असला, तरी खरी लढत ही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्येच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे
मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांचा आकडा मोठा असला, तरी खरी लढत ही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्येच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे, तर कधी या प्रमुख पक्षांतील नाराज बंडोबा अपक्ष उमेदवारी दाखल करतात. प्रतिस्पर्धीची मतं खाण्यासाठीही काही उमेदवार उतरविलेले असतात. मात्र, प्रमुख उमेदवार सोडल्यास ८० ते ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचेच चित्र आहे.
दक्षिण मुंबई मतदार संघातून आपले नशीब आजमावणाऱ्या हौशा-गवशांचा आकडा मोठा असला, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजपा युती अशा थेट लढतीत रंगत आली आहे. मुंबईतील अन्य लोकसभा मतदार संघांच्या तुलनेत दक्षिण मुंबईतून सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २००४ मध्येही या मतदार संघात केवळ सात उमेदवार होते, तर २००९ आणि २०१४ मध्ये प्रत्येकी २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत कायम राहिल्यामुळे उभय पक्षांच्या उमेदवारांमध्येच सर्व मतं विभागली गेली आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांचे डिपॉझिट प्रत्येक निवडणुकीत जप्त झाल्याचे चित्र आहे. यावेळेस १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
>डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.