सलग सुट्ट्यांमुळे वाढली उमेदवारांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:56 AM2019-04-15T06:56:35+5:302019-04-15T06:57:14+5:30

मुंबईसह राज्यातील १७ जागांवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी आलेल्या सलग सुट्ट्या, लगीनसराई यामुळे उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.

Due to frequent vacancies, candidates are scared | सलग सुट्ट्यांमुळे वाढली उमेदवारांची धास्ती

सलग सुट्ट्यांमुळे वाढली उमेदवारांची धास्ती

Next

मुंबई : मुंबईसह राज्यातील १७ जागांवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी आलेल्या सलग सुट्ट्या, लगीनसराई यामुळे उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. सलग सुट्ट्यांचे निमित्त करून लोकांनी पिकनिकचे प्लान केल्यास मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय नेत्यांनी नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी शासकीय कार्यालये-आस्थापना, बँकांना सुट्टी असते. शिवाय, अनेक खासगी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही पाच दिवसांच्या आठवड्याचे सूत्र वापरले जाते. त्यामुळे शनिवार २७ आणि रविवार २८ एप्रिलला अनेकांना सुट्टी असणार आहे. त्यातच सोमवारी २९ एप्रिलला मतदानामुळे मिळणाºया आणखी एका सुट्टीची भर पडणार आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण सहकुटुंब पर्यटन, देवदर्शन वगैरेसाठी प्रवासाचे बेत आखण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याचा संभव आहे.
त्यात भर म्हणजे सध्या लग्नसराईचा काळ आहे. शिवाय, २६, २७ आणि २८ या तिन्ही दिवशी लग्नाचे मुहूर्त आहेत. अनेकांनी आधीच मुहूर्त आणि मंगल कार्यालयांच्या उपलब्धतेनुसार तारखा निश्चित केल्या आहेत.
कोकण अथवा पश्चिम महाराष्ट्रात मूळ गावी लग्न करण्याचा ट्रेंड अनेक घरांमध्ये असतो. तशीच स्थिती पोटापाण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड वगैरे भागातून मुंबईत स्थायिक झालेल्या अन्य भाषिकांची आहे. २६, २७ आणि २८ दरम्यान आप्त आणि मित्रमंडळींच्या आपापल्या भागातील लग्नाला हजेरी लावून २९ ला मतदानासाठी मुंबईत परतणे अनेकांना शक्य होणार नाही. या सर्वांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीच्या निर्मितीसाठी जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लग्नसभारंभ किंवा अन्य काही कार्यक्रम ठरवले असले तरी मतदानाचा दिवस मोकळा ठेवावा, मतदानापुरता तरी वेळ लोकांनी काढायला हवा. गावी जाणाºया नागरिकांनी २९ एप्रिलनंतरचा बेत ठरवावा, असे आवाहन आम्ही मतदारसंघात करत आहोत.
- राहुल शेवाळे, खासदार आणि दक्षिण मध्यचे शिवसेना उमेदवार
गावी जा किंवा आणखी कुठेही जा, पण त्याआधी मतदान करा. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. देशात स्वच्छ सरकार यायला हवे. त्यासाठी मतदान आवश्यक आहे.
- आमदार नसीम खान,
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष
>वीकेण्डला जोडून मतदानाचा दिवस असल्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. हा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आयपीएल सामन्यांदरम्यानही मतदानाच्या जागृतीसाठी जाहिरातबाजी केली जाणार आहे. तसेच नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘माय फस्ट व्होट माय सेल्फी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
- शिवाजी जोंधळे,
मुंबई शहर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी

Web Title: Due to frequent vacancies, candidates are scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.