“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं

By प्रविण मरगळे | Published: September 24, 2020 04:08 PM2020-09-24T16:08:56+5:302020-09-24T16:22:01+5:30

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेला करावे लागले त्यावरूनही गेल्या 24 तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते.

Due to Heavy Rain in 24 hrs for Mumbai Water logging, Reason by Shiv Sena Also target opposition | “पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं

“पाणी साचल्यावर बोंबा मारणारे तेव्हा गप्प असतात”; मुंबईची तुंबई होण्यामागं शिवसेनेनं दिलं ‘हे’ कारणं

Next
ठळक मुद्दे 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी.महापालिकेतील कर्मचाऱ्यांविरोधात एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच

मुंबईमुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपले बोंबा मारणे सुरूच ठेवतात अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून विरोधकांना फटकारलं आहे.

हवामान खात्याने मान्सूनच्या परतीचा ‘मुहूर्त’ काही दिवसांपूर्वी सांगितला आहे. तरी सध्या सुरू असलेले पावसाचे धुमशान पाहता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणसह खान्देश, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आदी भागांत आणखी काही दिवस त्याचा मुक्काम राहील अशी चिन्हे आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जच आहेत, पण आपल्याकडे अनेकदा ‘मान्सूनची लहर; केला कहर’ अशीच स्थिती असते. हवामान खात्याने पावसाचा अलर्ट पुन्हा दिला आहे. तेव्हा प्रशासकीय यंत्रणांना हायअलर्ट राहावेच लागेल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

सामना अग्रलेखाती महत्त्वाचे मुद्दे

मुंबई आणि मुसळधार पर्जन्यवृष्टी हे काही नवीन समीकरण नाही. मंगळवारी तेच घडले. फक्त 24 तासांत तब्बल 286.4 मिमी पाऊस मुंबापुरीवर कोसळला. मागील अडीच दशकातील 24 तासांत कोसळलेला हा विक्रमी पाऊस होता.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेला करावे लागले त्यावरूनही गेल्या 24 तासांत पावसाने मुंबईत केलेल्या धुमशानाची कल्पना येते. 1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता.

बरं, सव्वा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या या महानगरीचे चलनवलन फक्त एकटय़ा महापालिकेच्या हातात आहे का, तर तसेही नाही. इतरही सरकारी यंत्रणांकडे मुंबईच्या वेगवेगळय़ा कामांची जबाबदारी आहे. अशा सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी.

प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर, वाहतुकीवर होतो. पुन्हा मुंबईची भौगोलिक आणि इतर स्थिती याचाही भाग आहेच. अशाही परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात.

अशा वेळी त्यांच्याविरुद्ध एकतर्फी बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच आहे. मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात. मुंबई पावसाने जलमय होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. तशी ती घेतली जातच असते, पण 24 तासांत अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसे व्हायचे?

बरे, मागील काही वर्षांत मुंबईच्या पावसानेही ‘मूड’ बदलला आहे. कधी तो 24 तासांत विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच घडले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी पावसाचे भरभरून दान पडले आहे.

एरवी दुष्काळाची परिसीमा गाठणाऱया मराठवाडा, विदर्भात पर्जन्यकृपा झाली आहे. जायकवाडी, कोयनासारखी धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील इतरही मोठे, मध्यम सिंचन प्रकल्प भरले आहेत. काही मोजके तालुके वगळता या वर्षी वरुणराजाने राज्यावर तशी कृपाच केली आहे.

रब्बी पिकासाठी ते चांगले असले तरी मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस, न मिळालेली उघडीप यामुळे खरिपाच्या काही पिकांना तडाखा बसू शकतो. तूर, कापूस, सोयाबीन, भात आदी पिकांना आता उघडीप हवी आहे. ती मिळाली नाही तर ही पिके हातची जाऊ शकतात.

Web Title: Due to Heavy Rain in 24 hrs for Mumbai Water logging, Reason by Shiv Sena Also target opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.