लाट नसल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:51 AM2019-04-18T00:51:21+5:302019-04-18T00:51:47+5:30
२०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.
- नजीर शेख
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आ. सुभाष झांबड, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत होत आहे. २०१४ सारखी लाट नसल्याने यंदा शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.
चारवेळा विजयी झालेले खासदार खैरे हे शिवसेनेचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, यंदा त्यांच्याविरुद्ध वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना काँग्रेसचे आ. झांबड यांनी आव्हान दिले आहे. मात्र, एमआयएमचे आ. जलील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर अडचणी आहेत. दुसऱ्या बाजूला आ. जाधव यांनी खैरेंविरुद्ध आघाडी उघडत दंड थोपटल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. मतदारसंघात एक गोष्ट दिसत आहे. आ. झांबड म्हणतात, माझी लढत खा. खैरे यांच्याशी आहे. आ. जलील म्हणतात, आम्ही शिवसेनेविरुद्ध लढा देत आहोत, तर आ. जाधव म्हणतात माझा मुकाबला केवळ खैरे यांच्याशी आहे. मात्र, शिवसेनेकडून आमची लढत एमआयएमशी असल्याचे मुद्दामहून सांगितले जात आहे.
खैरे यांना आ. जाधव यांचा धोका आहे, तर आ. झांबड यांना आ. जलील यांची भीती आहे. आ. जाधव यांची भिस्त ही मुख्यत: ग्रामीण मराठा मतदारांवर आहे. आ. जलील यांना वंचित आघाडीमुळे दलित समाजाची ६० ते ७० टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजात त्यांच्याविषयीची नाराजी प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुस्लिम समाजाची एमआयएमला भरभरून मते
मिळणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.
शहरातील कचरा, पाणी समस्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धची नाराजी याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार आ. झांबड यांना होऊ शकतो. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रचारात उतरल्याने काँग्रेसचे झांबड यांची बाजू भक्कम झाली आहे. मतांची विभागणी आणि जातीय ध्रुविकरण कसे होते, यावर या तिरंगी लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.
>शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचा हा किल्ला अभेद्य आहे. आतापर्यंत अनेकांनी हा किल्ला भेदण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आगामी काळात शेतकºयांच्या प्रश्नावर तसेच पाणी आणि रस्ते यावर आपला भर असेल.
- चंद्रकांत खैरे,
उमेदवार शिवसेना
>गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात विकासकामे झालीच नाहीत. कचरा आणि पाणीटंचाईने औरंगाबादकर वैतागले आहेत. शेतकºयांची कर्जमाफी झालीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही युतीच्या विरोधात वातावरण आहे. आता बदल होणारच.
- आ. सुभाष झांबड,
उमेदवार, काँग्रेस
>कळीचे मुद्दे
औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांमध्ये सरकारविषयी नाराजी.
मुद्यांवर फारसा प्रचार नाही. एकमेकांविरुद्ध असणाºया घटकांना आपल्याकडे वळविण्याच्या गणितावर भर.