बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान भाजपामध्ये बंडाळी, आमदार म्हणाले हे मंत्रिमंडळ सवर्णविरोधी
By बाळकृष्ण परब | Published: February 9, 2021 01:05 PM2021-02-09T13:05:55+5:302021-02-09T13:06:44+5:30
Bihar Cabinet Expansion News : काठावरचे बहुमत मिळवून बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे.
पाटणा - काठावरचे बहुमत मिळवून बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होत आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराला वादविवादांचे ग्रहण लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपात धुसफूस सुरू झाली असून, भाजपाच्या एका आमदाराने आपल्याच पक्षाच्या मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली आहे.
भाजपाचे आमदार ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान आपल्याच पक्षाच्या मंत्रिमंडळावर टीका केली आहे. बाढ मतदारसंघातील भाजपा आमदार ज्ञानेंद्र सिंह यांनी आपला पक्ष आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही नेत्यांना भाजपाला आपल्या खिशातील पक्ष बनवले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ना क्षेत्रिय समीकरणे विचारात घेतली आहेत ना सामाजिक समीकरणे लक्षात घेतली आहेत. आज झालेला मंत्रिमंडळ विस्तार हा सवर्णविरोधी आहे, या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांनी आपल्या मर्जीतल्या लोकांची वर्णी लावली आहे. तर अन्य नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लॉबिंग होत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्रिपद अशा व्यक्तीला दिली गेले आहे ज्याला काहीच माहिती नाही. राजपूत समाजातून येणाऱ्या ज्ञानू यांनी आरोप केला की, काही लोकांनी भाजपाला केवळ यादव आणि बनिया लोकांचा पक्ष बनवले आहे. पक्षातील अनेक आमदार या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज आहे. आता आम्ही यावर चर्चा करून पुढे निर्णय घेऊ.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी झाल्यावर मंगळवारी ८४ दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.