विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस सदस्याची सहज निवड - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:11 AM2021-02-16T03:11:45+5:302021-02-16T03:12:13+5:30

Ashok Chavan : लोकमत’च्या संपादकीय मंडळासमवेत सोमवारी अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.

Easy election of Congress member as Assembly Speaker - Ashok Chavan | विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस सदस्याची सहज निवड - अशोक चव्हाण

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस सदस्याची सहज निवड - अशोक चव्हाण

googlenewsNext

औरंगाबाद : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदी तीनही पक्षांच्या समन्वयातून सर्वमान्य व्यक्तीची निवड केली जाईल. या पदावर काँग्रेसच्या सदस्याची निवड होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही, असे काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
‘लोकमत’च्या संपादकीय मंडळासमवेत आज, सोमवारी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. जागावाटपात ही जागा काँग्रेसकडेच होती आणि नव्या अध्यक्षांची निवड करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत महत्त्वाचा पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका आहे. यावर त्यांनी प्रकाश टाकला.
समृद्धी महामार्ग जालन्याहून नांदेडात जोडण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यासाठी ९५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेडहून ३ तासांत औरंगाबादेत पोहोचता येईल. निधीची उभारणी करताना सरकारी मालमत्तेतून होईल शिवाय खासगी-सार्वजनिक भागीदारी असे पर्याय वापरले जातील. मराठवाड्यातील लगतची शहरेही जोडता येतील. मराठवाड्याच्या पायाभूत सुविधांकडे फडणवीस सरकारने दुर्लक्ष केले, उपेक्षा केली याचे शल्य मनात आहे व केंद्राच्या अर्थसंकल्पात ३२८ प्रकल्प रस्त्यांचे आहेत, पण येथेही मराठवाड्याची उपेक्षाच झाली. हा दृष्टिकोन हैदराबाद-मनमाड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणातही दिसतो. ब्राॅडगेजसुद्धा संघर्ष करूनच मिळाले, याची आठवण त्यांनी करून दिली. शेंद्रा आणि बिडकीन या डीएमआयसी क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झालेले नाही. 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या रस्त्याची घोषणा केली होती, पण काम रेंगाळले. वनजमिनीचा प्रश्न, जमीन अधिग्रहणातील समस्यांमुळे मराठवाड्यातील रस्ते रेंगाळले.  अकार्यक्षम कंत्राटदारांमुळे मराठवाड्यातील १७ ते १८ रस्त्यांचे प्रकल्प रखडले आहेत. अनेक रस्त्यांचे अधिग्रहण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेले आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. नांदेडमध्ये खलिस्तान समर्थकाला अटक करण्यात आली. हा एक संवेदनशील प्रश्न असून परवाचे प्रकरण पोलिसांच्या सतर्कतेने लक्षात आले. पंजाबात गुन्हे करून इकडे गुन्हेगार येऊ शकतात आणि याबाबत पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Easy election of Congress member as Assembly Speaker - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.