योगी, मायावतींना वादग्रस्त भाषण भोवणार?; निवडणूक आयोगानं 24 तासांत मागितलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 11:11 PM2019-04-11T23:11:45+5:302019-04-11T23:18:29+5:30
दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींना जोरदार धक्का दिला आहे. या दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगानं वादग्रस्त विधानांबद्दल नोटीस बजावली. 24 तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दोन्ही नेत्यांना देण्यात आलं आहे. या नेत्यांवर आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई होऊ शकते.
हिंदूंकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असं वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ मेरठमधील प्रचारसभेत केलं होतं. सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर मायावतींनी मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. या वादग्रस्त विधानांची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे.
काय बोलले होते योगी आदित्यनाथ?
हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले होते.
काय बोलल्या होत्या मायावती?
मुस्लिमांनो, काँग्रेस भाजपाला टक्कर देऊ शकत नाही. फक्त महाआघाडीच भाजपाचा पराभव करु शकते. मतविभाजन टाळून महाआघाडीला एकगठ्ठा मते द्या.
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची तपासणी सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाची निवडणूक आयोगाकडून तपासणी सुरू आहे. मोदींनी बालाकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख करत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय नमो टीव्हीवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.