खडसेंच्या जाण्याने काय फरक पडतो, दाखवतोच; भाजपाला थेट इशारा
By हेमंत बावकर | Published: October 29, 2020 10:29 PM2020-10-29T22:29:56+5:302020-10-29T22:30:57+5:30
Eknath Khadse : खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना त्यांच नाव राष्ट्रवादीने पुढे केले असल्याचंही सांगण्यात येते.
राज्यपालांच्या कोट्यातून 12 विधानपरिषद आमदारांची नावे निश्चित होणार आहेत. आज महाविकास आघाडीने यासाठी प्रस्ताव संमत केला. यामध्ये नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंचा समावेश असणार आहे. यावर खडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पद मिळाले किंवा नाही मिळाले तरीही काम करणार आहे. आमदारकी मिळाली तर आनंदच होईल, असे म्हटले आहे.
याचबरोबर त्यांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांना जबरदस्त इशारा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने भाजपाला काही फरक पडणार नाही असे महाजन यांनी म्हटले होते. यावरून खडसे यांनी माझ्या जाण्याने काय फरक पडतो हे लकरच कळेल. आगामी काळात कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे, हे दिसेल असा इशारा दिला आहे.
खडसे यांच्या मागे अनेक आमदार, पदाधिकारी, खासदार राष्ट्रवादत जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले तरी भाजपा मधील कोणीही नेते त्यांच्या मागे जाणार नाहीत किंवा त्यांच्या जाण्याने भाजपला ही कोणताही फरक पडणार नाही, अशी वक्तव्ये महाजन, रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावर खडसे यांनी भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत. आज कोणताही मोठा बदल दिसणार नसला तरी आगामी काळात मात्र कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईल. पक्षात कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना अशी वक्तव्य करावीच लागतात, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना त्यांच नाव राष्ट्रवादीने पुढे केले असल्याचंही सांगण्यात येते. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला नाही किंवा कोणतेही पदही मागितलेली नाही. पद मिळाले तरी काम करणार आहे आणि नाही दिलं तरी कार्यकर्ता म्ह्णून काम करणार आहे. आपल्या मतदारसंघात रखडलेली विकास कामे पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मात्र पक्षाने आमदारकी दिली आनंदच होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं.