Eknath Khadse : तुमच्यासोबत किती आमदार, खासदार भाजप सोडणार; एकनाथ खडसेंनी सांगितला आकडा
By बाळकृष्ण परब | Published: October 21, 2020 02:30 PM2020-10-21T14:30:10+5:302020-10-21T15:09:50+5:30
Eknath Khadse News : भाजपा सोडणाऱ्या खडसेंसोबत त्यांचे समर्थक असलेले किती आमदार आणि खासदार जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जळगाव - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या अनेक दिवसांच्या नाराजीनंतर आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, भाजपा सोडणाऱ्या खडसेंसोबत त्यांचे समर्थक असलेले किती आमदार आणि खासदार जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आपल्यासोबत किती आमदार, खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत याची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
खडसे म्हणाले की, भाजपावर आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. मी येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत किती आमदार, खासदार आहेत असे विचारले असता खडसे यांनी सांगितले की, माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार नाही. मी एकटाच राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. रक्षा खडसे ह्या भाजपामध्येच राहणार आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.