एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
By ravalnath.patil | Published: October 22, 2020 04:15 PM2020-10-22T16:15:32+5:302020-10-22T16:17:57+5:30
Eknath Khadse : एकनाथ खडसे उद्या (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
मुक्ताईनगर : नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ खडसे उद्या (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी गुरुवारी एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे सुद्धा आहेत. याशिवाय, एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जळगावमधून वाहनाने अनेक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता."मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला," असे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते.
उद्या खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार
मुंबईत उद्या (२३ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.