एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं - देवेंद्र फडणवीस

By ravalnath.patil | Published: October 21, 2020 07:18 PM2020-10-21T19:18:54+5:302020-10-21T19:25:48+5:30

Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांनी आपल्याला व्हिलन ठरविले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Eknath Khadse made me a villain - Devendra Fadnavis | एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं - देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं - देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देमाझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला,असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

मुंबई : भाजपाचे नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम ठोकला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. 

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला."मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला," असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्याला व्हिलन ठरविले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही, भाजपा हा मोठा पक्ष, कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपासोबतच आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

"दिल्या घरी सुखी राहावं"
राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे. 

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया..
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसंच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी ४० वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय. 

एकनाथ खडसेंचा कधी होणार पक्ष प्रवेश? 
मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: Eknath Khadse made me a villain - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.