"एकनाथ खडसे इतक्या ताकदीचे नेते नाही, त्यांना स्वत:च्या मुलीला निवडून आणता आलं नाही"
By प्रविण मरगळे | Published: November 16, 2020 06:38 PM2020-11-16T18:38:10+5:302020-11-16T18:39:57+5:30
BJP Leader Prasad Lad on NCP Eknath khadse, Sharad Pawar News: आपासातील भांडणामुळेच हे सरकार पडणार आहे, भाजपाचं कोणतंही ऑपरेशन लोटस वैगेरे सुरु नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत, या दौऱ्याच्या निमित्ताने एकनाथ खडसे शक्तीप्रदर्शन करतील असं सांगण्यात येत आहे. परंतु एकनाथ खडसे इतक्या ताकदीचे नेते नाही, त्यांना स्वत:च्या मुलीला निवडून आणता आलं नाही, त्यामुळे खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असा टोला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसाद लाड म्हणाले की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, परंतु आता त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ खडसेंची तडफड सुरु आहे. पण त्यांनीही काहीही केलं तरी भाजपा कमजोर नाही, आम्ही सक्षम आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असं त्यांनी सांगितले.
तसेच मंदिर उघडण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे, हा निर्णय थोडा आधी केला असता तर बरं झालं असतं. जी आंदोलन भाजपाने केली, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलनं केली, त्याचा आज विजय झाला. या निर्णयात श्रेयवादाचा प्रश्न येतोच कुठे? सर्व धार्मिक स्थळं उघडा ही आमची मागणी होती, मदिरालय उघडतात पण मंदिरे का नाही हा आमचा प्रश्न होता. लोकं जेव्हा मंदिरात जातात तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा मिळते त्यासाठी मंदिरे उघडण्याची भाजपाची मागणी होती असंही प्रसाद लाड म्हणाले.
त्याचसोबतच संजय राऊत यांनी सरकार पडणार नाही हे वक्तव्य केलं होतं, त्यावर प्रश्न विचारला असता दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनीही सरकार पडण्याची भीती व्यक्त केली होती, भाजपाच्या एका नेत्यानेही सरकार पाडणार असं विधान केले नाही. जे तिघाडी सरकार आहे, ते आपापल्या भांडणाने पडेल असं आम्ही म्हणतो, वेळोवेळी शिवसेना नेते मनातील भीती व्यक्त करत आहेत, त्यामुळे अशी विधान करत आहेत, पुढील काळात जनता बघेल. जनतेची कामं होत नाही, बदल्यांच्या भानगडीत सरकार अडकले आहेत, आमदारांची कामे होत नसल्याने आमदार नाराज आहेत, आपासातील भांडणामुळेच हे सरकार पडणार आहे, भाजपाचं कोणतंही ऑपरेशन लोटस वैगेरे सुरु नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार हे मोठे नेते आहेत, ५० वर्ष शरद पवार राजकीय दौरे करत आहे, राजकीय दौरे हा त्यांचा आवडीचा विषय आहे, परंतु एकनाथ खडसेंसाठी दौरा केल्याने भाजपाला फटका बसेल असं अजिबात नाही असंही प्रसाद लाड यांनी सांगितले. शरद पवार येत्या २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.