चंद्रकांत पाटील म्हणतात, खडसेंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:46 IST2020-10-09T03:21:27+5:302020-10-09T06:46:31+5:30
Chandrakant Patil On Eknath khadse: खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरही पाटील यांचं भाष्य

चंद्रकांत पाटील म्हणतात, खडसेंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; पण...
मुंबई : एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, असे मत व्यक्त करतानाच खडसे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
भाजप कार्यसमितीच्या बैठकीतनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत, अशी चर्चा तुम्हीच (पत्रकार) करता; पण ते पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करणार नाहीत. आजच्या कार्यसमितीच्या बैठकीला ते पूर्णवेळ हजर होते. राष्ट्रगीत आटोपूनच गेले. तुम्ही पत्रकार त्यांना इकडेतिकडे ढकलता, पण ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे ज्यांना जग मानते अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल त्यांनी अनुद्गार काढणे योग्य नाही, असे मत पाटील यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.