बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 10:08 AM2024-10-06T10:08:26+5:302024-10-06T10:22:10+5:30
Bacchu Kadu Mla rajkumar patel: तिसऱ्या आघाडीची मोट बांधत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आमदार बच्चू कडू यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. बच्चू कडूंनीही याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.
Bacchu Kadu On Eknath Shinde, Mahayuti: परिवर्तन महाशक्ती आघाडीची मोट बांधत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंना निवडणुकीआधीच धक्का बसण्याची शक्यता आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. याला कारण ठरले आहे, एक कार्यक्रम पत्रिका! महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकुमार पटेल हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला बच्चू कडू यांनीही दुजोरा दिला आहे.
बच्चू कडूंचा फोटो गायब, शिंदेंना स्थान
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. या पुत्रिकेवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे, तर एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठ्या आकारात छापण्यात आला आहे. या पत्रिकेमुळे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
शिंदे गटाला परिणाम भोगायला लावू; बच्चू कडूंचा इशारा
आमदार राजकुमार पटेल यांच्या पक्षांतराच्या चर्चेबद्दल बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, "आपापला राजकीय स्वार्थ असेल, त्यानिमित्ताने ते गेले असेल. त्याची आम्हाला काही परवा नाही, त्यांनी आहे तिथे सुखाने राहावं. पण, आम्ही शिंदे साहेबांनी जो एक घाव केला आहे, त्याच्यावर आम्ही हजारो घाव देऊ. त्यांनी एक खेळी खेळली आम्ही खेळी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू", असा इशारा बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.
"आम्ही राजकुमारजींसोबत मैत्री कायम ठेवून आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. कसं आहे की, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून त्यांचं ऋण आमच्यावर होतं. आम्ही ते डोक्यात ठेवू. पण, त्यांनी खेळलेली खेळी त्यांना घातक ठरेल", असे बच्चू कडू म्हणाले.