UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:46 PM2022-01-11T15:46:44+5:302022-01-11T15:47:36+5:30

UP Election 2022: तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

up election 2022 ncp nawab malik replied bjp cm yogi adityanath over his statement | UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

Next

मुंबई: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक (UP Election 2022) जाहीर झाल्यापासून तेथील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशमदील निवडणूक ८० विरुद्ध २० अशी असेल, असे म्हटले होते. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या कामांवर तुम्हाला विश्वास नाही का? तुमचे सरकार रामभरोसे झाले आहे का, अशी खोचक विचारणा मलिक यांनी केली आहे. 

ज्या पद्धतीने योगींनी ८० विरुद्ध २० टक्क्यांवरून विधान केले आहे की, जे लोक राम मंदिराचा विरोध करत आहेत. त्यांच्याशी सामना हा ८० टक्के लोकांचा आहे. त्यांनी थेट मुस्लिमांविरोधात हे विधान केलेले आहे. योगीजी तुम्ही इतिहास तपासून पाहावा, राम मंदिर-बाबरी मशीद विवादापासून सर्व मुस्लीम संघटना असतील, मुस्लीम असतील एकच सांगत होते की न्यायालयाचा जो निर्णय येईल आम्ही तो मान्य करू, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. 

कोणीच त्याचा विरोध करत नाही

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक नेहमीच सांगत आले आहेत की, आम्ही न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही. आम्हाला वाटते की, जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केला, देशाने स्वीकारला. कोणीच त्याचा विरोध करत नाही. मंदिर निर्माणाचे काम सुरू आहे आणि तरीही तुम्ही मंदिरावरून वादग्रस्त वक्तव्य करत आहात. आपल्या कामांवर तुम्हाला विश्वास नाही का? तुमचे सरकार रामभरोसे झाले आहे का, असा प्रश्न मलिकांनी विचारला आहे. 

हे योगीजींच्या पराभवाचे मुख्य कारण बनणार

आम्हाला वाटते की, ज्या प्रकारचे विधान योगी करत आहेत, हे स्पष्ट होत आहे की भाजप उत्तर प्रदेशमध्ये पराभूत होत आहे. लोकामध्ये त्यांच्या विरोधात असलेला राग आणि नाराजी हे योगीजींच्या पराभवाचे मुख्य कारण बनणार आहे. तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असून, उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोरोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला असून, कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. 
 

Web Title: up election 2022 ncp nawab malik replied bjp cm yogi adityanath over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.