UP Election 2022: ओमप्रकाश राजभर BJP सोबत जाणार? बंद दाराआड ३ तास खलबतं; राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 09:19 AM2022-01-09T09:19:21+5:302022-01-09T09:20:24+5:30
UP Election 2022: गेल्या महिनाभरापासून ओमप्रकाश राजभर आणि दयाशंकर सिंह यांच्यातील ही तिसरी भेट असल्याचे सांगितले जात आहे.
लखनऊ: गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि योगी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या ओमप्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांना सोबत घेण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांचा (UP Election 2022) कार्यक्रम जाहीर होताच भाजप नेते दयाशंकर सिंह यांनी ओमप्रकाश राजभर यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचे सांगितले जात असून, यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या महिनाभरापासून ओमप्रकाश राजभर आणि दयाशंकर सिंह यांच्यातील ही तिसरी भेट असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चांवर बोलताना ओमप्रकाश राजभर यांचे पुत्र अरुण राजभर यांनी टोला लगावत, दयाशंकर सिंह हेच आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी आमच्याकडे येत असल्याचे खोचक पलटवार केला आहे. भाजप नेते ओमप्रकाश राजभर यांचे मनपरिवर्तन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.
भाजपला का हवीय ओमप्रकाश राजभर यांची साथ?
सन २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष NDA मधील एक घटकपक्ष होता. मात्र, नाराजीमुळे ओमप्रकाश राजभर समाजवादी पक्षासोबत जात असल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले होते. काही महिन्यांपूर्वी अखिलेश यादव आणि ओमप्रकाश राजभर यांची आघाडीसंदर्भात भेटही झाली होती. ओमप्रकाश यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. असे झाल्यास समाजवादी पक्षासाठी संघटनात्मक, भावनात्मक धक्का देण्याची तयारी भाजप करत आहे. पूर्वांचल भागासाठी ओमप्रकाश राजभर यांची साथ महत्त्वाची मानली जात आहे. ओमप्रकाश राजभर भाजपसोबत गेल्यास खूप मोठा फायदा पक्षाला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.