निवडणुकांची घोषणा आज की सोमवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:53 AM2019-03-09T04:53:36+5:302019-03-09T04:53:49+5:30
१७व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी होणार की सोमवारी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली : १७व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी होणार की सोमवारी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाची यासाठीची सर्व तयारी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणूक ७ ते ८ टप्प्यांत पार पडेल, असे सूत्रांनी सांगितले. सर्व राज्य सरकारांकडून या आठवड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले असून केंद्र सरकारनेही अनेक निर्णय जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या खात्यांतील योजना व कामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजनाचे कार्यक्रमही जवळपास आटोपले आहेत.
लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. शिवाय सध्या राष्ट्रपती राजवट असलेल्या जम्मू व काश्मीरमध्येही निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या काही आठवड्यांमध्ये देशभरात बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला होता. महाराष्ट्रातही आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या आज दिवसभर बैठका सुरू होत्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. राजकीय पक्षही कामाला लागले असून, भाजपाची केंद्रीय समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काँग्रेस आणि सपाने उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. प्रचारानेही जोर पकडण्यास सुरूवात झाला आहे.