एळकोट: कर्त्या पोरांचा जमला मेळा अन् बापाच्या पोटात उठला गोळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 03:15 AM2019-09-14T03:15:42+5:302019-09-14T03:15:56+5:30

मोरूने आन्हिक आटोपले. पांढरी सुरुवार चढवून त्यावर भगवा कुर्ता घातला. गळ्यात कधी भगवे, तर कधी हिरवे-भगवे उपरणे टाकत होता;

Elkot: A gathering of karta por gathers and arises in father's stomach! | एळकोट: कर्त्या पोरांचा जमला मेळा अन् बापाच्या पोटात उठला गोळा !

एळकोट: कर्त्या पोरांचा जमला मेळा अन् बापाच्या पोटात उठला गोळा !

Next

सुधीर महाजन

गेल्या आठवडाभरापासून मोरूचा बाप बेचैन होता. अन्नपाणी गोड लागत नव्हते, की रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. सगळा उत्साह आटून गेल्यासारखे होते. भरगणपतीमध्ये त्याला एका निराशेने घेरले होते. सगळीकडे उदासीनता भरून राहिली होती. तो कोणाशीही बोलत नव्हता. गणपतीच्या धामधुमीत बायको, सून कोणाच्याही लक्षात आले नव्हते. घड्याळाचा आचके देत गजर झाला. बॅटरी संपली असावी. त्याने पाहिले. सकाळचे साडेचार वाजले होते. मोरूच्या खोलीतला लाईट लागला. मोरू बाहेर आला आणि ब्रशवर पेस्ट घेऊन दात घासायला सुरुवात केली. किलकिल्या डोळ्याने मोरूचा बाप हे पाहत होता. उन्हं वर आल्याशिवाय न उठणारं कार्ट भल्या पहाटे गजर लावून का उठलं याचं त्याला कोडं पडलं.

गेल्या महिन्याभरापासून मोरूचे लक्षण ठीक दिसत नव्हते. यावर्षी तो न वर्गणी मागायला गेला, ना त्याने गणपतीत भाग घेतला. याचेही मोरूच्या बापाला आश्चर्च वाटले. काल तर विसर्जनाच्या दिवशी मोरूने कपड्याचे कपाट रिकामे केले. पांढरे कुर्ते, गांधी टोप्या बाजूला काढल्या आणि नव्याने खरेदी केलेले भगवे कुर्ते हिरव्या-भगव्या रुमालांची व भगव्या टोप्यांची चळत त्याने नाजूक हाताने ठेवली. काय हे भडक कपडे आणले, या बायकोच्या प्रश्नावर मोरू भडकला. बायकोलाही आश्चर्य वाटले. पांढऱ्या कपड्यावर साधा डाग न सहन करणाºया मोरूची टेस्ट अशी कशी अचानक बिघडली. मोरूच्या बापानेही कान लावून हे ऐकले होते.

मोरूने आन्हिक आटोपले. पांढरी सुरुवार चढवून त्यावर भगवा कुर्ता घातला. गळ्यात कधी भगवे, तर कधी हिरवे-भगवे उपरणे टाकत होता; पण नेमके कोणते उपरणे राहू द्यावे याचा निर्णय होत नव्हता. सारखे उपरणे हातात घेऊन बायकोही अवघडली होती. मोरूचा हा प्रकार बाप पलंगावर पडल्यापडल्या किलकिल्या डोळ्याने न्याहाळत होता. हे पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला, पोरगं वाट बदलतंय वाटतं, म्हणजे आपली साथ नक्की सोडणार. पोरगं सोडून गेलं की काय होतं, याचा अंदाज उस्मानाबादच्या हिंदकेसरी पहिलवानाच्या अवस्थेवरून आला होता. एकेकाळी सगळ्यांना आस्मान दाखवणारे हे पहिलवान हतबल झाले होते. गुजरातमधल्या एका बनियाला भेटण्यासाठी पोरगा त्यांना घेऊन सोलापुराकडे निघाला. अर्ध्या वाटेवर असतानाच बनियाने निरोप पाठवला की, बापाला सोडून एकटाच ये. पोराने बापाला घरी सोडण्याऐवजी अर्ध्या वाटेवरच कारमधून उतरवून दिले आणि सुसाट वेगाने निघून गेला. तेव्हा पहिलवानाची अवस्था ‘घर का, ना घाट का’, अशी झाली. पोरगं सोडून निघून गेलं. पोराला जन्म दिला, वाढवलं. त्याच्यासाठी एवढी इस्टेट उभी केली.

आपल्या हातातले घड्याळ काढून त्याच्या हातावर बांधले. अगदी वानप्रस्थाश्रमाच्या उंबरठ्यावर उभे राहून पोराचे कल्याण चिंतले; पण पोरगं भरदुपारी भररस्त्यावर सोडून निघून गेलं. नेमकी हीच भीती मोरूच्या बापाला वाटत होती आणि आता मोरूची उपरण्याची घालमेल पाहून त्याच्या पोटात खड्डाच पडला. पोरगं घराबाहेर काढते का, याची चिंता वाढली. मोदींचं ऐकलं नाही, याचाही पश्चात्ताप झाला. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ असे मोदींनी सांगितले अन् ‘साहेबांनी’ ऐकले; पण आपण साहेबांचे पट्टशिष्य असूनही त्यांचे साधे अनुकरण केले नाही, याचा पश्चात्ताप झाला. ‘साहेबांची पोरगी कर्ती झाली आणि आता तिने घराची सगळी सूत्रे हाती घेतली; पण आपल्यासारखेच साहेबांच्या पाठीराख्याचे पोर पाय लावून पळाले. ही पोरगी भरपावसात आंधळी कोशिंबीर खेळताना दिसते. डोळ्याला पट्टी लावून ती साहेबांच्या साथीदाराला पकडते; पण ज्याला पकडते त्यावेळी पट्टी काढून पाहताच त्या साथीदाराच्या खांद्यावर भगवा-हिरवा रुमाल दिसतो, तरी पण ती हिंमत खचू देत नाही, याचा मोरूलाही अभिमान वाटला आणि साहेबांचा हेवाही. पोरगं नेमकं कोणत्या घरात जातं याची काळजी त्याला वाटते.

मोरूच्या बापाची चुळबुळ वाढली, तसे सूनबाईचे लक्ष गेले. मामंजी उठले वाटतं? असं स्वत:शी बोलत ती जवळ आली ‘‘बाबा उठा, चहा टाकते’’ अशी म्हणत ती स्वयंपाकघराकडे वळली. तिला पाठमोरी पाहून मोरूचा बाप म्हणाला ‘सूनबाई माझं पित्त खवळलं वाटतं जरा, देशी गायीचं दूध देऊन पाहते का?

Web Title: Elkot: A gathering of karta por gathers and arises in father's stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा