फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक

By प्रविण मरगळे | Published: September 27, 2020 03:39 PM2020-09-27T15:39:11+5:302020-09-27T15:42:36+5:30

फडणवीस आणि राऊत भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा जवळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली.

Emergency meeting between NCP Sharad Pawar and CM Uddhav Thackeray after Fadnavis-Raut meeting | फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक

फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक

googlenewsNext
ठळक मुद्देसामना मुलाखतीसाठी आमची भेट झाल्याचा फडणवीस आणि राऊत यांचं स्पष्टीकरण संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही - फडणवीस एकमेकांना न भेटायला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही - संजय राऊत

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये शनिवारी तब्बल २ तास भेट झाली, या भेटीची माहिती सुरुवातीला लपवण्यात आली, परंतु माध्यमांनी याबाबत वृत्त दाखवल्यानंतर संजय राऊत आणि भाजपानेही ही भेट झाल्याचं कबूल केले, परंतु या भेटीमुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.

फडणवीस आणि राऊत भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा जवळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली. या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसही अलर्ट झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत, या दोघांमध्ये राज्यातील प्रश्न आणि सध्या सुरु असणारी परिस्थिती यावर चर्चा होणार आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला. एकमेकांना न भेटायला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात. पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवसेना नेते संजय राऊत यांना सामनासाठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. त्यावर मी जरूर मुलाखत देईन असं त्यांना म्हटलं. पण माझ्या काही अटी, शर्ती आहेत. मुलाखत घेताना तिथे माझाही कॅमेरा असेल, अशा माझ्या काही अटी, शर्टी आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकदा भेटून बोलू असं ठरलं होतं. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो घेतो, असं फडणवीस म्हणाले. भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही, हे सरकार स्वत:च्या कृतींमुळेच कोसळेल, या विधानांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल भाजपाची कुठलीही चर्चा नाही. तशी चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही करत आहोत. हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. त्यावेळी काय करायचं ते तेव्हा बघू. सरकार स्थापनेची आम्हाला कुठलीही घाई नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात झाली होती २ तास गुप्त बैठक

सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये शनिवारी दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे हा प्रश्न आहे. मात्र फडणवीस राऊत बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे. 

Web Title: Emergency meeting between NCP Sharad Pawar and CM Uddhav Thackeray after Fadnavis-Raut meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.