“राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; ‘शिवसेना भवन फोडू’ म्हणजे महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:23 AM2021-08-02T08:23:34+5:302021-08-02T08:27:19+5:30
आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.
मुंबई – भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय युद्ध चांगलेच रंगलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपात संघर्षाची भाषा सुरू झाली आहे. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड(Prasad Lad) यांच्यावर टीका केल्यानंतर आता सामना अग्रलेखातून भाजपाचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आला आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे.
सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधलं आहे. भाजपाची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून महाराष्ट्रात भाजपाचा अंतकाळ जवळ आला आहे हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत. ‘शिवसेना भवन फोडू’ अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. जी शिवसेना घरभेद्यांच्या निषेधाच्या आरोळय़ांनी गडबडली नाही, दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपच्या फसवेगिरीने नाउमेद झाली नाही. उलट आज ती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
त्याचसोबत भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. जनता पक्षाच्या काळातही काही मंडळींनी असाच उतमात केला. शिवतीर्थावरील एका सभेच्या निमित्ताने शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा इस्पितळात पोहोचली याचा इतिहास भाजपमधील बाटग्यांनी समजून घ्यावा. शिवसेना भवनाशी पंगा घेतल्याने त्यांचा तो जनता पक्ष भविष्यात औषधालाही शिल्लक राहिला नाही असा इशाराही भाजपाला देण्यात आला आहे.
दरम्यान, १९९२ च्या ‘बाबरी’ दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरून घरातच गोधडय़ा भिजवत होते. ‘‘आम्ही बाबरी पाडली नाही हो।।’’, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करू पाहतात ही आडवाणी – अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय? असंही शिवसेनेने भाजपाला सुनावलं आहे.