'भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:33 PM2021-08-15T14:33:52+5:302021-08-15T14:34:45+5:30
12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले.
मुंबई: असे राज्यपाल भविष्यात येतील, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही वाटलं नसेल, अशी खोचक टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे. विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीवरुन मुश्रीफ यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
माध्यमाशी संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले की, 'एका कार्यक्रमात आमदार विनय कोरेंनी विचारल्यावर चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं बोलणं झाल्याचं म्हणाले. तसचे, आपलं सरकार येईपर्यंत सदस्यांची नियुक्ती करायची नाही, असं सांगितलंय. यावरूनच राज्यपालांवर किती दबाव आहे, हे स्पष्ट होतंय. 9 महिने झाले अजून निर्णय नाही. ती यादी आवडली नसेल तर पुन्हा पाठवा, आम्ही परत पाठवू पण निर्णय घ्या. होय म्हणा किंवा नाही म्हणा, पण निर्णय घ्या, असं मुश्रीफ म्हणाले.
मग नियुक्तीबाबत तुम्ही आग्रह का धरता?
12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेते शरद रणपिसे यांना सुनावले. 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते.