"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 05:34 PM2024-09-17T17:34:44+5:302024-09-17T17:35:24+5:30
Girish Mahajan Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. खडसेंनी एका मुलाखतीत केलेल्या टीकेला महाजनांनी आता उत्तर दिले आहे.
Girish Mahajan On Eknath khadse : भाजपातील प्रवेशाला गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांकडून विरोध झाल्याचे सांगत एकनाथ खडसेंनी टीका केली होती. गिरीश महाजनांना मोठे करण्यासाठी मला संपवले आणि गिरीश महाजनांचे फडणवीस ऐकतात, असे खडसे म्हणाले होते. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.
गिरीश महाजन नांदेडमध्ये होते. येथे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरी खासदार अशोक चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली. त्यानंतर बोलताना गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले.
पत्नी निवडून आली नाही, मुलगीही पडली
एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधताना गिरीश महाजन म्हणाले की, "खडसेंचा प्रवास खूप मोठा होता. ते गेले त्यांचे काय राहिले? काहीच राहिले नाही. जे पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाही. दूध डेअरीमध्ये आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण उभे राहिले. १५० किमी लांब त्यांच्या मतदारसंघात जाऊन खडसे वहिनींचा पराभव केला. त्या दूध डेअरीच्या चेअरमन होत्या."
"जिल्हा बँकेवर त्यांचे काही राहिले नाही. विधानसभेला त्यांच्या कन्या देखील पडल्या आहेत. पक्ष हा पक्ष असतो. कोण येते, कोण जाते, हे चालूच राहणार आहे. ज्यांना आजमवायचे आहे, त्यांनी आजमवावे", असे म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले.
भरत गोगावले पुढच्या मंत्रिमंडळात शपथ घेतील -महाजन
तीन महामंडळाच्या तीन नियुक्त्या करण्यात आल्या. तिन्ही मंडळावर शिवसेनेच्या नेत्यांची वर्णी लागली. याबद्दल गिरीश महाजन म्हणाले की, "हा विषय पक्षश्रेष्ठी बघतात. मला वाटते की देवेंद्रजींना हा विषय माहित असेल."
मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या भरत गोगावलेंना महामंडळातही संधी दिली गेली नाही. त्याबद्दल महाजन म्हणाले, "येत्या १५-२० दिवसांत आचारसंहित लागणार आहे. मंत्रिपद मिळून काय करणार? पुढच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा शपथ घेतील."
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची चाचपणी?
नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या जागेवरून वसंतराव चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचा निर्णय जिल्हा काँग्रेसने घेतला आहे.
स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांनी भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. आगामी पोटनिवडणुकीत भाजपाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची चर्चा होत आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, लोकसभेची जागा रिक्त झाल्याने ते निवडणूक लढवणार का? या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण, गिरीश महाजन आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भेटीची चर्चा होत आहे.