"डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", आशिष शेलारांचा घणाघात
By मोरेश्वर येरम | Published: December 8, 2020 01:02 PM2020-12-08T13:02:42+5:302020-12-08T13:11:19+5:30
मुंबई नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज ' भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. ...
मुंबई
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'लामहाराष्ट्रातली चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 'भारत बंद'वर जोरदार टीका केली आहे. "डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत", असा घणाघात आशिष शेलार यांनी विरोधकांवर केला आहे.
आशिष शेलार यांनी एक ट्विट केलंय. "मुंबईतील गिरणी कामगारांना कुणी संप करायला लावला? कुणी कामगारांना फसवलं? कुणी कामगारांना उध्वस्त केलं? कुणी मालकांचे फायदे करुन दिले?", असा सवाल उपस्थित करत शेलार पुढे म्हणतात की, "माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!", अशी टीका त्यांनी केलीय.
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला...?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020
माझ्या शेतकरी बांधवानो,
तुम्ही आठवा थोडे मागचे,
मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!
शेलार यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात राज्यात झालेल्या कृषी कायद्याबाबत भाष्य केलंय. "काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? काँग्रेसने स्वत: जे केले त्याविरोधातच भारत बंद? काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये!", असं आवाहन शेलार यांनी केलं आहे.
■काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020
■काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच भारत बंद?
काँग्रेसच्या फसवणूकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये!