आता तरी भाजपने प्रमाणिकपणे विरोधी पक्षाचं काम करावं; रोहित पवारांचा खोचक सल्ला
By मोरेश्वर येरम | Published: December 4, 2020 01:32 PM2020-12-04T13:32:09+5:302020-12-04T13:34:43+5:30
रोहित पवार यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत.
मुंबई
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचीही भर पडली आहे. "भाजपच्या पुणे, नागपुरच्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला. आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रमाणिक काम करावं", असा खोचक सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपला केवळ एका जागेवर यश मिळालं असून पुणे आणि नागपूरची जागा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजली जात होती. या जागावंरही महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रोहित पवार यांनी विजय उमेदवारांचं अभिनंदन करणारं एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत.
"भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तर महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेवून भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली आहे", असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी #मविआ साठी निष्ठेची होती.राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली.या निवडणुकीत जनतेने #मविआ ची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2020
रोहित पवार यांनी आणखी एका ट्विटमध्ये भाजपला सल्ला देऊ केला. "भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रमाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही", असं रोहित पवार म्हणाले.
भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं #महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी @BJP4Maharashtra ने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2020