Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा
By प्रविण मरगळे | Published: November 14, 2020 12:31 PM2020-11-14T12:31:13+5:302020-11-14T12:41:32+5:30
Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
मुंबई - सुशांत सिंग राजूपतला बिहारचं मानत नाही, तो मुंबईचा आहे, मुंबईत येऊन सुशांतची ओळख निर्माण झाली, सुशांत आमचा मुलगा आहे, त्याच्यासोबत चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ, किंचाळूच चुकीचं बोलणं खरं होत नाही. जे सत्य असते ते शांतपणेही त्याचं काम सुरु ठेवतं. जे सत्य आहे ते लपवून नवीन काही शोधायचं प्रयत्न सुरू होता असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
कुणाल कामरासोबत झालेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी सुशांत राजपूत प्रकरणावर भाष्य केले. सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची तुम्हाला कोणाची ऑर्डर होती का? ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का? मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो शतप्रतिशत खरा होता, जगातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचा समावेश आहे. वर्दीचा सन्मान राखला पाहिजे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणतात, त्यांच्याच सुरक्षेत फिरता, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, शरद पवारांविरोधात बोलतात, त्या व्यक्तींसोबत पोलिसांनी राहू नये हे आम्ही बोललो नाही. पोलीस त्यांचे काम करतात, त्या व्यक्तीची सुरक्षा करणे हे सरकारचं काम आहे असं राऊत म्हणाले.
“या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"
त्याचसोबत लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, देश खूप मोठा आहे, एका पक्षाने देश चालत नाही, ६० वर्षात अनेक पक्ष आले अन् गेले, देश देशच राहतो, जो नडणारा असतो, बिनधास्त बोलतो त्याचं नाव नेहमी राहतं. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलं नाही, मोठमोठे नेते देशात आले, आज तुमच्याकडे सत्ता आहे, उद्या आमच्याकडे असेल, हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशीचा ससेमिरा तुमच्यामागेही लागू शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
खासगी आयुष्य वैगेरे काहीच नाही...
खासगी आयुष्य वैगेरे काय नसतं, खूप लहान वयात मी सामनाचं काम सुरु केलं, २८ वर्षाचा असताना माझ्यावर सामना संपादकाची जबाबदारी आली, बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्यासोबत काम करणं हे भाग्य होतं. ही फक्त मुंबईची लढाई नव्हती, तर देशाची लढाई होती, ज्याठिकाणी लोक राहतात त्याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य हवं ही बाळासाहेबांची भूमिका होती, देशावर संकट येतं तेव्हा सगळेजण एकत्र येतात. परंतु प्रत्येक राज्याची स्वत:ची संस्कृती आणि भाषा आहे. त्यावेळी शिवसेनेची मराठी माणसासाठी चळवळ सुरु केली. कित्येक लोक आंदोलनात मेली, विचारधारेसाठी मरण्यासही तयार आहे. संजय राऊत बॉम्ब आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ कोणी काम केले असेल तर त्यातील मी एक आहे असं संजय राऊत म्हणाले.