'फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला', नारायण राणेंचं ते ट्विट व्हायरल

By ravalnath.patil | Published: October 21, 2020 11:03 PM2020-10-21T23:03:06+5:302020-10-21T23:12:19+5:30

Narayan Rane : एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

'Fadnavis took Khadse as a political victim', Narayan Rane's tweet went viral | 'फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला', नारायण राणेंचं ते ट्विट व्हायरल

'फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला', नारायण राणेंचं ते ट्विट व्हायरल

Next
ठळक मुद्देनारायण राणे यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत चार वर्षांपूर्वी एक ट्विट केले होते.हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मुंबई : नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे एक जुने ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतल्याचे म्हटले आहे.

नारायण राणे यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत चार वर्षांपूर्वी एक ट्विट केले होते. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून भाजपामध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट 4 जून 2016 मध्ये करण्यात आले होते. दरम्यान, आता एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

बुधवारी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला."मी फक्त देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला," असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं - देवेंद्र फडणवीस
एकनाथ खडसे यांनी आपल्याला व्हिलन ठरविले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला, हे दुर्दैवी आहे. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. माझ्याबाबत तक्रारी असतील तर त्यांनी वरिष्ठांकडे जायला पाहिजे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याचबरोबर, एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे आहे. त्यांनी मला ठरवले. मला त्यावर काहीही बोलायचे नाही, भाजपा हा मोठा पक्ष, कुणाच्या जाण्याने किंवा येण्याने पक्ष थांबत नाही. जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथील जनता भाजपासोबतच आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

"दिल्या घरी सुखी राहावं"
राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे. 

एकनाथ खडसेंचा कधी होणार पक्ष प्रवेश? 
मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: 'Fadnavis took Khadse as a political victim', Narayan Rane's tweet went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.