"लबाड लांडगं ढोंग करतंय, मतं मागण्यासाठी सोंग करतंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:31 AM2019-04-16T00:31:44+5:302019-04-16T00:33:02+5:30
गीतेंनी प्रकाशित केलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेत अनेक कामांमध्ये घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तळा : गीतेंनी प्रकाशित केलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेत अनेक कामांमध्ये घोटाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेण तालुक्यातील झोतिरपाडा गावामध्ये समाज मंदिर बांधल्याचा त्यात उल्लेख केला गेला आहे. गावातील एका युवकाने अशा प्रकारचे समाज मंदिर गावात कुठेच नाही. समाज मंदिर चोरीस गेल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावी लागली आहे असे सांगत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या शैलीत अनंत गीते यांचा खरपूस समाचार घेतला. पक्ष प्रमुखांच्या जाहीर सभेत कोकणच्या विकासासाठी काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे हे सांगण्याऐवजी जनतेसमोर लोटांगण घातलेले मंत्री त्यावर मला दादा कोंडके यांचं एक गीत आठवलं लबाड लांडगं ढोंग करतंय आणि मतं मागण्याचं सोंग करतंय असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची जाहीर प्रचार सभा रविवारी तळा आणि कुडे येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
खारपाड तेथे साडेतीन लाख रु.खर्चून गटार बांधण्यात आल्याचे या पुस्तिकेत दाखविण्यात आले आहे. पेण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दयानंद भगत यांच्या पत्नी येथे सरपंच आहेत ते अजून हे नवीन बांधलेलं गटार शोधत आहेत. गुहागर येथे आ.भास्कर जाधव यांनी केलेली कामे या पुस्तकात छापण्यात आली आहेत. म्हणूनच मी सातत्याने म्हणतोय गीते साहेबांचे काम दाखवा दोन हजार मिळवा, असे तटकरे म्हणाले. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलेल्या उद्धव ठाकरेंनी शेवटी त्यांच्याशीच युती केली. ही युती जनतेच्या हितासाठी असे हे सांगतात तर गेली पाच वर्षे एकमेकांवर कुरघोड्या करण्यात का वाया घालवली? सत्तेत आल्यापासून शिवसेनेने स्वत: ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारवर टीका केली. निवडणुका आल्या की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन असं खा. गीते म्हणाले होते, मात्र आज त्यांची एवढी प्रचाराची भाषणं होत आहेत, त्यांनी एकदाही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत.
या सभेला काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, राजिप सदस्य अस्लम राऊत, माणगाव शेकाप चिटणीस रमेश मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>‘२३ मेला वाघाची शिकार करणार’
हेच गीते मला विषारी साप म्हणाले होते, पण गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचे साक्षीदार इथले लोक आहेत, त्यांनी मला घडवलं आहे. राजकारणात कधी साधा डासही मारला नाही, मात्र यावेळी २३ मेला मी वाघाची शिकार करणार आहे, असे खुले आव्हान त्यांनी गीतेंना केले.
मागच्या वेळी माझ्या विरोधात एक सुनील तटकरे उभा केला होता, यावेळी दोन केले आहेत, एक काय दहा सुनील तटकरे उभे केले, कितीही डाव खेळलात तरी लोक यावेळी फसणार नाहीत. मी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करीत आहेत माझ्यावर केस दाखल आहे असे म्हणतात, मग माझ्या नामनिर्देशन अर्जात हरकत का घेतली नाही.