Farmer Protest : शेतकरी आंदोलनामुळे देशात पसरतोय बर्ड फ्लू, भाजपा आमदाराची मुक्ताफळे
By बाळकृष्ण परब | Published: January 9, 2021 04:34 PM2021-01-09T16:34:13+5:302021-01-09T16:37:55+5:30
Farmer Protest Update: शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे.
कोटा - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनावरून भाजपाचेराजस्थानमधील आमदार मदन दिलावर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. देशात बर्ड फ्लूचा फैलाव होण्यामागे शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे, असे विधान मदन दिलावर यांनी केले आहे.
दिलावर म्हणाले की, शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरवण्यामध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे. दरम्यान, दिलावर यांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांमध्ये दहशतवादीही लपून बसल्याचीही शंका व्यक्त केली. तसेच मोठ्या संख्येने रस्ता अडवून बसलेल्या आंदोलकांना आता सरकारने रस्त्यावरून उठवले पाहिजे अन्यथा बर्ड फ्लूसारखे घातक आजार फैलावून हे शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन देशामध्ये मोठे संकट निर्माण करेल.
दिल्लामध्ये गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता भाजपा आमदार मदन दिलावर यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मदन दिलावर यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मदन दिलावर यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या या विधानाचा शेतकरी नेत्यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे. तसेच मदन दिलावर यांनी सांप्रदायिक सौहार्द बिघडवल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. मदन दिलावर तसेच भाजपाचे इतर नेते शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकशाहीविरोधी पद्धतीने वक्तव्ये करून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष दुलीचंद बोरदा यांनी केला आहे.