शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 12:05 PM2020-11-29T12:05:40+5:302020-11-29T12:06:46+5:30
कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक; हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशावर
नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या लाठीमारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय. हे दुर्दैवी आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी आंदोलन करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे.
'कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला दिली जाणारी वर्तणूक निषेधार्ह आहे. हे शेतकरी देशातले नाहीत, ते बाहेरून आले असावेत, अशी वागणूक त्यांना दिली जात आहे. रस्त्यावर उतरलेले बहुतांश शेतकरी पंजाब आणि हरयाणातून आलेले आहेत. त्यांना विभाजनवादी, खलिस्तानी म्हणणं हा त्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ आपण पंजाबमध्ये पुन्हा तोच काळ आणू इच्छिता. लोकांना आठवण करून देऊ इच्छिता की तुम्ही पुन्हा त्याच मार्गानं जावं. देशाच्या स्थिरतेसाठी हे चांगलं नाही,' अशी टीका राऊत यांनी केली.
The way farmers have been stopped from entering Delhi, it looks like as if they don't belong to this country. They have been treated like terrorists. Since they are Sikh&have come from Punjab&Haryana, they're being called Khalistani. It is insult to farmers:Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/XaE529oZUL
— ANI (@ANI) November 29, 2020
गेल्या चार दिवसांपासून हजारो शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याऐवजी मैदानात आंदोलन करावं. त्यानंतर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे.