शेतकरी आंदोलन! 'अनेक नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत'; एका ट्विटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 09:37 AM2021-01-30T09:37:35+5:302021-01-30T09:47:42+5:30
Farmer Protest : बठिंडा पंचायतीने तर प्रत्येक घरातून एकजण आंदोलनाला गेलाच पाहिजे नाहीतर त्य़ा घरावर दंड आकारण्याचे फर्मान जारी केले आहेत. उत्तर प्रदेशमधूनही आता शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी केलेल्या ट्विटमुळे भाजपाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
नवीन कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. टिकैत पाहिजे की डकैत असा सवाल होताच आता अनेक ठिकाणांहून घरात असलेले नव्या दमाचे शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. बठिंडा पंचायतीने तर प्रत्येक घरातून एकजण आंदोलनाला गेलाच पाहिजे नाहीतर त्य़ा घरावर दंड आकारण्याचे फर्मान जारी केले आहेत. उत्तर प्रदेशमधूनही आता शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी केलेल्या ट्विटमुळे भाजपाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
शेतकरी नेता नरेश टिकैत यांनी ट्विट केले आहे. ''माझ्याकडे आज काही भाजपा नेत्यांचे फोन आले आहेत. आम्ही भाजपाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षात राहून अशाप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. जर आताही आम्ही गप्प बसलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करू शकणार नाही.'', असे त्यांनी ट्विट केले आहे.
याआधी नरेश टिकैत यांनी ट्विट करून म्हटले होते की, माझा धाकटा भाऊ राकेश टिकैतचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. आता आम्ही या आंदोलनाला निर्णायक स्थितीमध्ये नेऊनच श्वास घेणार आहोत.
मेरे पास आज कई भाजपा नेताओं का फोन आया है , उनका कहना है भाई साहब हम भी इस्तीफा दे रहे हैं , पार्टी में रहकर यूँ किसानों का अपमान होते नहीं देख सकते, अगर अब भी हम चुप रहे तो आने वाली पीढ़ी हमें कभी माफ नहीं करेगी।
— Naresh Tikait (@NareshTikait_) January 29, 2021
२६ जानेवारीच्या संघर्षानंतर नंतरचे दोन दिवस शेतकरी नेते आणि लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण गेलेत. लक्षवेधी आंदोलन भूतकाळात जमा होईल असे चित्र निर्माण झाले होते. आंदोलकांची संख्या कमी होताना पाहून पोलीसही विविध सीमांवर दंडा उगारून होते. यात पलवल सीमेवरील आंदोलन संपविण्यात पोलीस दलाला यश आले. दुसरा नंबर होता गाझीपूर सीमेचा. इथले नेत्वृत्व राकेश टिकैत करीत आहे. गुरुवारी रात्री अर्धसैनिक बल आणि पोलिसांच्या अनेक तुकड्या गाझीपूर सीमेवर तैनात होत्या. योगी सरकारने या सीमेवरून आंदोलकांना हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपल्यावर रात्री आपत्ती येऊ शकते हे राकेश टिकैत यांनी हेरले. त्यांनी लगेच माध्यमांपुढे आपल्या भावना व्यक्त करीत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
‘टिकैत हवे की डकैत, तुम्हीच ठरवा’; भावनिक आवाहनानंतर सीमांवर पुन्हा गर्दी!
दोन महिन्यांपासून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेत, आता आम्ही सरकारच्या डोळ्यात आसंव पाहू असा निश्चय केला. समाजमाध्यमांवरून शेतकऱ्यांना ‘फिरते व्हा’ चे आवाहन करण्यात आले. त्याला इतका मोठा प्रतिसात मिळाला की १२ तासांतच ३० हजारांपेक्षा अधिक शेतकरी गाझीपूर सीमेवर आलेत. पलवलच्या सीमेवरून हाकलण्यात आलेले शेतकरीही गाझीपूर सीमेवर पोहचले. या सीमेवर पहिल्यांदाच ४० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. आता सरकारसोबत आरपारची लढाई करू असा संकल्पही करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची संख्या वाढतानाचे पाहून पिटाळण्यासाठी सज्ज असलेले सुरक्षा बल माघारी फिरले. टिकैत यांचे भावनिक आवाहन ऐकून हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेशमधून शेतकरी मोठ्या संख्येने पुन्हा गाझीपूर, सिंघू सीमेवर येत आहेत.
आंदोलन सुरूच राहील - नरेश टिकैत
मुजफ्फरनगर येथे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवर सुरू असलेले आंदोलन समाप्त करण्याची घोषणा गुरुवारी केली होती. परंतु रात्री या सीमेवर झालेल्या प्रकारामुळे त्यांनी घोषणा मागे घेतली. रात्री किसान भवन येथे आपतकालीन पंचायत बोलावण्यात आली आणि चौधरी नरेश टिकैत यांनी आता आंदोलन चालूच राहील असे सांगितले.