Farmers Protest : कृषी कायद्यांविरोधात भाजपा खासदार राजीनामा देणार, शेतकरी आंदोलनाला अजून बळ मिळणार
By बाळकृष्ण परब | Published: March 4, 2021 04:02 PM2021-03-04T16:02:28+5:302021-03-04T16:06:24+5:30
Farmers Protest, BJP MP will resign against agriculture laws : केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. त्यातच सरकार आणि आंदोलक शेतकरी आपापल्या म्हणण्यावर ठाम असल्याने या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आता भाजपामध्येच (BJP) असंतोष वाढत असून, भाजपाचा एक खासदार या कायद्यांचा विरोध करत राजीनामा देणार असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. (Rakesh Tikait Says, BJP MP will resign against agriculture laws, farmers' movement will get more strength)
राकेश टिकैत यांनी कृषी कायद्यांना विरोध करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत राजीनामा देण्याचा तयारीत असलेल्या या खासदाराचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. तसेच भाजपाचे जेवढे खासदार आहेत तेवढे दिवस शेतकरी आंदोलन चालेल, असा दावाही राकेश टिकैत यांनी केला.
दरम्यान, राकेश टिकैत यांनी केलेल्या दाव्यानंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कृषी कायद्यांना विरोध करत राजीनामा देण्याची तयारी करणारा भाजपाचा खासदार कोण याबाबतची चर्चा रंगली आहे. पश्चिम उत्तर प्रदेश भागातील भाजपाचा कुठलातरी खासदार कृषी कायद्यांना विरोध करत राजीनामा देईल, असा अंदाज आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या मते राजीनाम्यांची सुरुवात ही पंजाब-किंवा हरियाणामधून होईल.
दरम्यान, एका वृत्तानुसार टिकैत यांनी संसदेजवळ बाजार बनवण्याची तयारी केली आहे. ते म्हणाले की, सरकार सांगतेय की आम्ही कुठेही धान्य विकू शकतो. कुठल्याही भावाने विकू शकतो. अशा परिस्थितीत जिथे कृषी कायदे पारित केले गेले.त्याच संसदेच्या बाहेरच शेतकरी धान्य विकतील. कारण तिथे एमएसपीची हमी मिळून जाईल. दरम्यान, टिकेत यांच्याकडून शेतकऱ्यांना धान्य थेट दिल्लीत घेऊन येण्याचे आणि संसदेच्या आवारात विकण्याचे आवाहन केले जात आहे.