नाशिकचा गड सावरताना ठाकरे गटाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 12:52 AM2022-12-25T00:52:09+5:302022-12-25T00:57:07+5:30

संजय राऊत एक पत्रकार, खासदार म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. २०१९ च्या सत्तानाट्यानंतर प्रवक्ता, महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसशी संवाद साधणारा दुवा अशी त्यांची ओळख निर्माण झाली. भाजप, मोदी, फडणवीस यांना अंगावर घेणारा आणि ठाकरे सरकार आणि कुटुंबीयांवर होणारे हल्ले परतवून लावणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली.

Fatigue of the Thackeray group while recovering the stronghold of Nashik | नाशिकचा गड सावरताना ठाकरे गटाची दमछाक

नाशिकचा गड सावरताना ठाकरे गटाची दमछाक

Next
ठळक मुद्देदिल्लीत खुर्ची उचलून आणण्याची त्यांची कृती टीकेचा विषयठाकरे गटात संशय व संभ्रमाचे वातावरण निर्माणड्रायपोर्ट आणि ग्रीनफील्ड महामार्ग हे गडकरी यांनी पाहिलेले स्वप्न

बेरीज वजाबाकी

मिलिंद कुलकर्णी

संजय राऊत एक पत्रकार, खासदार म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. २०१९ च्या सत्तानाट्यानंतर प्रवक्ता, महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसशी संवाद साधणारा दुवा अशी त्यांची ओळख निर्माण झाली. भाजप, मोदी, फडणवीस यांना अंगावर घेणारा आणि ठाकरे सरकार आणि कुटुंबीयांवर होणारे हल्ले परतवून लावणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. सत्ता असली की, अनेक विशेषणे, गुण नेत्याला जोडली जातात. तसेच राऊत यांचे झाले.
शिवसेनेचे नेते असूनही शरद पवार यांची भलामण करताना ते अनेकदा दिसले, अगदी पवारांसाठी दिल्लीत खुर्ची उचलून आणण्याची त्यांची कृती टीकेचा विषय ठरली. शिवसेनेत इतर नेत्यांना त्यांनी कधीच मागे टाकले. ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा सेनेत शब्द चालतो, असा त्यांचा लौकिक तयार झाला. सत्ता गेली की, नेत्याची खरी कसोटी सुरू होते. १०० दिवसांच्या तुरुंगातील मुक्कामानंतर त्यांची उत्तर महाराष्ट्रावरील पकड ढिली झाली. भाऊसाहेब राऊत हा विश्वासू सहकारी हे त्याचे उदाहरण आहे.

ठाकरे गटात संशयाचे वातावरण

संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हे दोन प्रमुख नेते शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निवडणूक समितीचे सदस्य होते. तेच शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात संशय व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटाची महापालिका निवडणूक रणनीती ठरविणाऱ्या समितीत आता जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड उरले आहेत. दोघे निघून गेल्यानंतर माजी आमदार वसंत गिते, उपनेते सुनील बागूल यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी येथे लोकसभेची तयारी सुरू केल्याने त्यांचे नाशिकमधील लक्ष कमी झाले आहे. उरलेल्या १९ नगरसेवकांना कसे सांभाळावे, हा प्रश्न आता पदाधिकाऱ्यांपुढे आहे. एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्याशी वैयक्तिक स्नेह, संकटकाळात त्यांनी केलेली मदत याविषयी अनेक माजी नगरसेवक अजूनही कृतज्ञतेची भावना बोलून दाखवतात. शिंदे यांनी साद घातली तर ही मंडळी टिकेल काय, हा प्रश्न आहेच.

दिलीप बनकरांना गावात धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:च्या गावातच धक्का बसला. पिंपळगाव बसवंतच्या निवडणुकीत त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी भास्कर बनकर यांनी सरपंचाची निवडणूक जिंकली आणि दिलीप बनकर यांच्या पुतण्याचा गणेश बनकर यांना तिसऱ्या स्थानावर ढकलून मोठा पराभव केला. गणेश बनकर यांच्या मातोश्री सरपंच होत्या. अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असताना आमदारांनी गावासाठी विकासकामे आणण्यासाठी प्रयत्न केले; पण मतदारांनी विरोधकांना संधी दिली. राज्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीत आमदारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. माजी आमदार अनिल कदम यांचे आव्हान त्यांच्यापुढे आहेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच भास्कर बनकर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन करत असतानाच प्रकृतीची काळजी घेण्याची सूचना केली. त्यामुळे बनकर हे ठाकरे गटात राहतात की, शिंदे गटात जातात, हा प्रश्न आता चर्चेला आला आहे. भाजप उमेदवारानेदेखील चांगली लढत दिली.

गडकरींच्या घोषणांनी वाहतूक प्रश्न सुटेल

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी येऊन गेले. नाशिक जिल्ह्यात बिकट बनलेल्या वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. इंदिरानगर, राणेनगर बोगद्याची लांबी वाढविण्याच्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली. दोन्ही बोगद्यांची लांबी आता १५ मीटरने वाढणार आहे. द्वारका सर्कल ते नाशिकरोडदरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाला त्यांनी मंजुरी दिली. ६ कि.मी.च्या या उड्डालपुलासाठी १६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ड्रायपोर्ट आणि ग्रीनफील्ड महामार्ग हे गडकरी यांनी पाहिलेले स्वप्न आहे. मात्र, त्यात अनंत अडचणी येत आहेत. तरीही ते आशावादी आहेत. हे दोन्ही प्रकल्प झाल्यास मोठी क्रांती होईल. द्राक्ष, कांदे व ऑटोमोबाइल क्षेत्रातील आयात व निर्यात करण्याचे नाशिक हे मोठे केंद्र बनू शकेल. गडकरी यांनी प्रयत्न तर चालविले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर मंत्री, खासदार व आमदारांनी पक्षभेद विसरून पाठपुरावा केला तर हे प्रकल्प मार्गी लागू शकतील.

वाहतुकीविषयी अहवाल आला, अंमल कधी?

नाशिकसारख्या २१ लाख लोकसंख्येच्या महानगराचा वाहतूक प्रश्न बिकट होत चालला आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. महापालिकेने रेझिलिइन्ट या खाजगी संस्थेला सर्वेक्षण आणि उपाययोजना सुचविण्याचे काम सोपवले होते. या संस्थेने ४० दिवस शहराच्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल महापालिकेला सुपूर्द केला आहे. त्यातील चिंताजनक बाब म्हणजे, तीन वर्षांत दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचा जीव अपघातात मोठ्या संख्येने गेला आहे. ५० टक्के दुचाकीस्वार तर २५ टक्के पादचारी मृत्युमुखी पडले आहेत. अपघातांची कारणेदेखील सर्वेक्षणातून समोर आली आहेत. वेगमर्यादेचे उल्लंघन, राँगसाईड वाहतूक ही प्रमुख कारणे आहेत. उपाययोजनादेखील या संस्थेने सुचविल्या आहेत. गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, दृश्यमानता वाढविणे, दिशादर्शक फलक, हायमास्ट दिवे, अतिक्रमण हटविणे तसेच वाहतूक बेटाचा आकार कमी करणे, भुयारी पादचारी मार्गाचा वापर करणे, वाहतूक वळविणे अशा काही उपाययोजना आहेत. महापालिका, वाहतूक शाखा यांच्याशी संबंधित हे विषय आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण कामगिरी केली तर हे प्रश्न सुटू शकतील.

Web Title: Fatigue of the Thackeray group while recovering the stronghold of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक