सुरगाण्यातील असंतोष आदिवासी पट्ट्यात धडकण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2022 12:34 AM2022-12-04T00:34:14+5:302022-12-04T00:39:16+5:30
महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक आणि गुजरातमध्ये विकास अधिक होत आहे, आपला भाग त्या राज्याला जोडला गेल्यास फायदा होईल ही जनभावना निर्माण होणे धोकादायक आणि धक्कादायक आहे. ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर आणि राज्य निर्मितीच्या ६२ वर्षांनंतर ही भावना असणे क्लेषदायक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. सीमावर्ती भागातील जनता शेजारील राज्यातील गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, रोजगार यासंबंधी प्रगती पाहात असेल, तर तुलना होणार आहेच.
बेरीज वजाबाकी
मिलिंद कुलकर्णी
महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक आणि गुजरातमध्ये विकास अधिक होत आहे, आपला भाग त्या राज्याला जोडला गेल्यास फायदा होईल ही जनभावना निर्माण होणे धोकादायक आणि धक्कादायक आहे. ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर आणि राज्य निर्मितीच्या ६२ वर्षांनंतर ही भावना असणे क्लेषदायक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. सीमावर्ती भागातील जनता शेजारील राज्यातील गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, रोजगार यासंबंधी प्रगती पाहात असेल, तर तुलना होणार आहेच. केवळ राजकारण म्हणून या विषयाकडे न पाहता आपल्याकडे असलेल्या त्रुटी, उणिवांविषयी मोकळेपणाने चर्चा करून, जनतेला विश्वासात घेऊन, कालबद्ध आराखडा तयार करायला काय हरकत आहे? दोन्ही राज्ये, तेथील सरकारांवर टीका करण्यापेक्षा आपल्या सीमावर्ती भागात विकासाची गंगा कशी वाहील, यासाठी सर्वंकष प्रयत्न करायला प्राधान्य द्यायला हवे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व समाज या तिघांनी याविषयाकडे गांभीर्याने न पाहिल्यास हा असंतोष वाढत जाऊन आदिवासी पट्ट्यापर्यंत धडकण्याची भीती आहे.
राजकारण तर होणारच...
गुजरातला जोडण्याची मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावीत यांनी केले. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार नितीन पवार हे करीत आहे. त्यामुळे गावीत यांच्या या मागणीने राज्य सरकार, सरकारमध्ये सहभागी भाजप, शिंदे गटासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनाही अडचणीत आणले आहे. त्यावरून राजकारणदेखील सुरू झाले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नाशकात आले असताना त्यांनी याविषयी राजकारण करू नये, जनतेच्या भावना भडकावू नये असे आवाहन केले. मात्र, पंधरा वर्षे ज्यांची सत्ता होती, त्यांचे हे पाप म्हणावे का असा सवाल करून दोन्ही कॉंग्रेसला छेडले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार दिलीप बोरसे हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे लागेल. अन्यथा, मतदारसंघातील विरोधक त्याचे राजकारण केल्याशिवाय राहणार नाहीत.
शिंदे गटातील ह्यआविष्कार
सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटात तीन प्रमुख नेते आहेत. मात्र, तिघांमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाही, असे जाहीर स्पष्टीकरण तिन्ही नेते दर आठवड्याला देत असले तरी पक्षांतर्गत कुरबुरी सुरू आहेत. त्या उघड झाल्याशिवाय राहत नाही. पालकमंत्री दादा भुसे व खासदार हेमंत गोडसे हे शासकीय बैठकीनंतर एकाच वाहनातून प्रवास करताना दिसत असताना त्याचवेळी भुसे यांचे पुत्र आविष्कार यांच्या वाढदिवसाच्या फलकांवर ह्यभावी खासदारह्ण अशी विशेषणे लावल्याचे समोर आले. आता खरे काय मानायचे? अर्थात ही कुरबूर वाढली आणि वरिष्ठांपर्यंत भावना पोहोचल्यानंतर काही फलकांवरील भावी खासदार शब्द हटविण्यात आले. या घडामोडीतून भुसे हे मुलाला पुढे चाल देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संमतीवाचून इतक्या मोठ्या संख्येने फलक जिल्ह्यात लागणे असंभव आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांना पक्षांतर्गत आव्हान उभे ठाकले आहे. अर्थात प्रत्येकवेळी उभ्या राहणाऱ्या आव्हानातून कसा मार्ग काढायचा, हे आप्पांना चांगले माहीत आहे.
हिंदुत्वावरून शिवसेनेची अडचण
आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे, पळीपंचपात्रीचे नाही, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सध्या महाराष्ट्राला सांगत आहे. सत्ता गेल्यानंतरही महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांनी संबंध कायम राखले आहेत. त्याचसोबत संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी या पक्षांशी जुळवून घेण्यात पुढाकार घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी तर थेट बिहारमध्ये जाऊन नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आहे. बेरजेचे राजकारण म्हणून या घडामोडींकडे बघितले तरी १९८९ नंतर स्वीकारलेल्या जहाल हिंदुत्वाच्या भूमिकेपासून पक्ष काहीसा दूर जात असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण होत आहे. कोणीही जाहीरपणे बोलत नसले तरी ही भावना प्रबळ आहे. सावरकरांविषयी राहुल गांधी आणि संभाजी ब्रिगेड यांनी केलेल्या वक्तव्याचा सेनेने विरोध केला, तो सैनिकांची भावना जपण्यासाठीच.
बेरीज वजाबाकी टोपी फिट्ट बसली !
शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते संजय राऊत प्रदीर्घ काळानंतर नाशिकमध्ये आले. स्वाभाविकपणे त्यांच्या दौऱ्याकडे शिवसैनिकांप्रमाणे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. नाशिकची सेना आणि पदाधिकाऱ्यांवर राऊत यांचा प्रभाव आहे. मात्र, सेनेतील बंडाळी, त्यानंतर राऊत यांचा तुरुंगवास, मध्यंतरी आदित्य ठाकरे यांचे दोन दौरे या रणधुमाळीत नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले होते. कोणीही मोठा नेता जरी शिंदे गटात गेला नसला तरी चर्चा मात्र सुरू असते. अमूक नेता ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे बसला आहे, मंत्रालयात वा वर्षा बंगल्यावर बैठक सुरू आहे, इतके माजी नगरसेवक जाणार अशा अफवांचा बाजार गरम आहे. आणि त्यात सेनेतीलच काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या होत्या. मातोश्री वा सेना भवनात जाताना सगळे एकत्र जाऊन एकीची माळ जपतात आणि नाशकात आल्यावर अफवा पसरवतात, हे उघड होत चालले होते. त्यावर राऊतांनी नेमके बोट ठेवले आणि टोपी फिट्ट बसली, असे म्हणायचे.