राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 05:02 PM2021-01-24T17:02:16+5:302021-01-24T17:03:00+5:30
Rohit Pawar : जळगावमध्ये रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे राजकारण, ईडी नोटीस, राजकारणाचे बदलेले रुप आणि युवकांची क्षमता या विषयांवर भाष्य केले.
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. येथील एका कार्यक्रमात रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे राजकारण, ईडी नोटीस, राजकारणाचे बदलेले रुप आणि युवकांची क्षमता या विषयांवर भाष्य केले. यावेळी पूर्वी सारखं राजकारण आता सोपे राहिले नाही. लोकांच्या हितासाठी वेळ द्यावा लागतो. सध्या राजकारणात मोठा ताणतणाव असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारणात आल्यावर 50 टक्के केस पांढरे झाले, असे रोहित पवार यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे डॉ. भूषण मगर यांच्या विघनहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि युवकांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना रोहित पवार बोलत होते. यावेळी "जनतेचे प्रश्न सोडवत असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवण्याला पहिले प्राधान्य द्यावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी करत असताना अनेक वेळा तणावासामोर जावे लागते. पूर्वी सारखं राजकारण आता सोपे राहिले नाही. लोकांच्या हितासाठी वेळ द्यावा लागतो. केस पांढरे झाले म्हणजे तणाव वाढल्याचे म्हटले जाते. सध्या राजकारणात मोठा ताणतणाव असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारणात आल्यावर 50 टक्के केस पांढरे झाले,"असे रोहित पवार यांनी सांगितले.
'केंद्र सरकारकडून राजकारणासाठी ईडीचा वापर'
ईडीची नोटीस आतापर्यंत कोणत्याही भाजपा नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील नेत्यांनाच म्हणजे पवार साहेबांना आणि शिवसेनेच्या आमदारांना आलेली असल्याच पाहायला मिळाले आहे. या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार ईडीचा वापर हा राजकरणासाठी तर करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे विधान रोहित पवार यांनी केले आहे.
'तरुणाई चुकीच्या मार्गाने लागली तर...'
युवकांमध्ये मोठी ताकद आहे, या ताकदीला जर आपण दिशा देऊ शकलो नाही तर ही ताकद वाया जाऊ शकते. तरुणाई चुकीच्या मार्गाने लागली तर मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. युवकांना ताकद देण्यासाठी आघाडी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. पण, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे आहेत. तसेच, युवकांनी आपला वापर कोणीही करून घेणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
'केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सन्मान द्यावा'
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक असो की तामिळनाडू असो शेतकरी हा शेतकरी असतो याचा विचार केंद्र सरकारने करण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलन सुरु झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले या चुकीच्या गोष्टी होत्या, असे सांगत रोहित पवार यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.