कटप्पानं बाहुबलीला मारलं याची सगळ्यांनाच माहिती; एकनाथ खडसेंना शिवसेनेत येण्याची ‘फिल्मी ऑफर’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 11:42 AM2020-09-06T11:42:45+5:302020-09-06T11:44:58+5:30
एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे यांची पक्षातील नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. खडसेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेभाजपा सोडणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा उधाण आलं आहे. यातच शिवसेना मंत्र्यांनी खडसेंना पक्षात येण्याची फिल्मी स्टाईलनं ऑफर दिली आहे.
याबाबत शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, एकनाथ खडसे हे शिवसेनेत आले तर आनंद होईल. शिवसेनेत आले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. ओबीसी समाजाला घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावं, आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलू. एकनाथ खडसे फक्त बोलतात पण ते निर्णय घेत नाहीत. तोंडातून बोलण्याऐवजी त्यावर अंमलबजावणी करावी. एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं ते म्हणाले.
तर राज्याच्या भाजपा वाढीत एकनाथ खडसेंचे योगदान आहे. राजकीय दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागतात, कधी कोणी मागे राहतं कधी कोणी पुढे जातं, राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे पाठवलं जातं, कधी माघार घ्यावी लागते. परंतु त्यांची नाराजी असेल ती आम्ही पक्षात एकत्र बसून सोडवू अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे. खडसे पुढे म्हणाले की, मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनतेसमोर आणणार आहे.
देवेंद्रजी अजितदादांवर टीका करूच शकत नाहीत
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करूच शकत नाहीत. कारण त्यांनी आपले सर्व सत्व-तत्व सोडून त्यांच्यासोबत तीन दिवस संसार केला आहे. त्यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. यासाऱ्यात त्यांनी नैतिकता घालविली आहे. त्यामुळे ते अजितदादा यांच्यावर टीका करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.सर्व कटकारस्थानाचे पुरावे मिळाले आहेत. अद्याप तरी हा प्रश्न पक्षाअंतर्गत आहे. याबाबत वरिष्ठांना भेटलो आहे. आता पुरावे ही देणार आहे. कारवाई झाली नाही तर पुढची दिशा ठरवू असं मत एकनाथ खडसेंनी मांडले आहे.