बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या ७१ जागांसाठी होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 03:04 AM2020-10-27T03:04:16+5:302020-10-27T07:24:10+5:30
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील १६ जिल्ह्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होणार आहे. यातील बहुतेक मतदारसंघ हे नक्षलप्रभावित असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत.
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. पहिल्या टप्प्यात बिहारमधील १६ जिल्ह्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होणार आहे. यातील बहुतेक मतदारसंघ हे नक्षलप्रभावित असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण १०६६ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, सुमारे २.१४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ७१ जागांपैकी भाजप २९, जदयू ३५ आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा ६ जागांवर लढत आहे, तर विकासशील इन्सान पार्टीने एका जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. महाआघाडीतील राजदने ४२ जागांवर, तर काँग्रेसने २१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सीपीआय एमएल ८ जागांवर लढत आहे. ज्या जागांवर लोकजनशक्ती पार्टी लढत नाही, अशा जागांवर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय लोजपने घेतला आहे. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी इमामगंज मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर त्यांच्याविरोधात राजदने बिहार विधानसभेचे माजी सभापती उदय नारायण चौधरी यांना उतरविले आहे.
८ कॅबिनेट मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
पहिल्या टप्प्यात प्रेम कुमार, राम नारायण मंडल, जयकुमार सिंह, कृष्ण नंदन वर्मा, शैलेश कुमार, संतोष निराला, विजय कुमार सिन्हा आणि ब्रिजकिशोर बिंड या ८ कॅबिनेट मंत्र्यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे.