Remadesivir: माजी भाजप आमदाराने रांगा लावून विकले रेमडेसिविर; नवाब मलिकांनी दिला पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:34 AM2021-04-21T05:34:44+5:302021-04-21T06:16:10+5:30
Remadesivir sold by former bjp Mla shirish chaudhari : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप. एखादा माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजार इंजेक्शन्सचा साठा ठेवतो, विकतो, आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटतो. हे सगळे मोठे षड्यंत्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून नंदुरबारच्या हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा जमा करून ठेवला. ८ आणि १२ एप्रिल रोजी त्यांनी नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात रांगा लावून इंजेक्शन्सचा काळाबाजार केला. त्यांनी २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिविर ब्रुक फार्मा कंपनीकडून आणून ठेवले होते. त्यामुळेच राज्याच्या एफडीएने वारंवार विचारणा करूनही ब्रुक फार्मा महाराष्ट्रात इंजेक्शन्स देण्यास तयार नाही, असा गंभीर गौप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी इंजेक्शन्सची विक्री चालू असलेले व्हिडिओ, फोटो, त्यांनी केलेल्या जाहिरातीदेखील माध्यमांना दिल्या आहेत.
एखादा माजी आमदार बेकायदेशीरपणे २० हजार इंजेक्शन्सचा साठा ठेवतो, विकतो, आणि नंतर तोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटतो. हे सगळे मोठे षड्यंत्र आहे. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात त्यांचा गोरखधंदा सुरू होता. त्याचवेळी विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे लेखी तक्रार करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करणार असल्याचेही ते म्हणाले.
आणखी गौप्यस्फोट करण्याचा इशारा
nतुमचा कारभार किती ‘क्रिस्टल’ आहे, याचा भंडाफोड आम्ही करू. भतीजाकडून कोणी काय मिळवले हेदेखील दाखवून देऊ.
nकांदिवली - मालाडचे आमदार रात्री कुठे बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतले आहे. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येत्या काळात आम्ही जाहीर करू, असा इशाराही मलिक यांनी दिला.
‘गरीब रुग्णांना वाटप केले हा गुन्हा ठरतो का?’
नंदुरबार : कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खान्देशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून कमी दरात रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरवले. हा गुन्हा वाटत असेल तर आम्ही गुन्हा केला, फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच आणि पुन्हा तो करणार, असे हिरा प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी आमदार शिरिष चौधरी यांनी सांगितले.
असे आहेत आरोप
ब्रुक फार्मा कंपनीकडून घेतले इंजेक्शन्स
२० हजारपेक्षा जास्त इंजेक्शन्सचा साठा
८ आणि १२ एप्रिल रोजी रांगा लावून विक्री
नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात काळाबाजार
यांची घेतली नावे
भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ.
हे दिले पुरावे
इंजेक्शन्सची विक्री चालू असलेले व्हिडिओ, फोटो, त्यांनी केलेल्या जाहिराती.
हे प्रश्न केले उपस्थित...
शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का?
महाराष्ट्र एफडीएने त्यांना तसा परवाना दिला होता का?
दमणच्या एफडीएने महाराष्ट्रात त्यांना इंजेक्शन विकण्याचा परवाना दिला होता का?