Devendra Fadnavis : "आम्ही भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही, तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:17 PM2021-06-04T20:17:42+5:302021-06-04T20:23:38+5:30
Devendra Fadnavis : आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पाडणे आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही, असे विधान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, आमचा एक विकासाचा अजेंडा असून तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 'लोकसत्ता'ने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. (former chief minister and bjp leader devendra fadanvis slams maharashtra government)
सरकार पडणे हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, "आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळ भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचे नाही".
याचबरोबर, सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणे आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय, या वेबिनारमध्ये अंतर्गत विरोधाभास दिसत असताना त्याला पाडणे हाच भाजपाचा कार्यक्रम असल्याची प्रतिमा का निर्माण होत आहे? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. यावर, "अशी प्रतिमा काही निर्माण होत नाही. पण माध्यमांनाही बातमी मिळते की हे पाडण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतात. या पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणे नाही", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस https://t.co/wf24ajerQu#CoronaVaccination#Corona
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021
'हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल'
"मी म्हणालो होतो त्याप्रमाणे घडत आहे. आपल्या अंतर्गत विरोधाने हे सरकार पडेल सांगितले तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हते. पण आता लोकांना जाणवू लागले आहे. धोरणात्मकतेचा अभाव लोकांना जाणवत आहे. मी गंमतीने तीन पायांची रिक्षा असून तीन पाय वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे म्हणायचो, पण आज हे जाणवत आहे. मला वाटते आमच्याकडे खूप संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचे काम अचूक करत आहोत. जनतेची गाऱ्हाणी मांडत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला काही करायची गरज नाही, हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 45 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे आहे. #JobOpportunity#bank#recruitment2021https://t.co/KxLZB4BumA
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021
'तो निर्णय चूकच होता, पण पश्चाताप नाही'
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाहाटेचा शपथविधी सोहळ्याची अद्यापही चर्चा होताना दिसते. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा गेला असे विधान पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. ते म्हणाले, "आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावे लागते. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचे होते. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केले. परंतु ते चुकीचे होते आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडले नाही. त्यांच्यात माझी जी प्रतीमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.