माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सलग साडेनऊ तास चौकशी; ईडीच्या कारवाईत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:05 PM2021-06-25T18:05:24+5:302021-06-25T18:07:26+5:30
महिन्याला १००कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून आधी सीबीआय आणि आता महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीच्या पथकाने देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तियांची चाैकशी केली
नागपूर : सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी केल्यानंतर ईडीने देशमुख यांचे निवासस्थान सोडले. ईडीने महिनाभरात दुसऱ्यांदा नागपुरात धडक दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक मुंबईहून गुरूवारी रात्री नागपुरात पोहोचले आणि शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता देशमुख यांच्या निवासस्थानी छापा घातला.
या पथकाने स्वतासोबत सीआरपीएफचाही ताफा आणला होता. त्यात सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यानंतर स्थानिक वरिष्ठांशी संपर्क करून पोलीस बंदोबस्त मागवून घेण्यात आला. त्यानुसार, सहायक पोलीस आयुक्त जाधव, सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस आणि अंबाझरीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्यासह मोठा पोलीस ताफा देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचला. निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अनिल देशमुख यांच्या पत्नी, मुलगा सलील आणि सून तसेच नातवंड, घरातील कर्मचारी आणि ऑपरेटर असे १० जण आतमध्ये होते. त्यांना एकत्र बसवून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशी सुरू केली. कागदपत्रे, कॉम्प्युटर, मोबाईल आणि लॅपटॉपही तपासले. सलग साडेनऊ तास चाैकशी केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता एका महिला अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक देशमुखांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांनी आपल्या सोबत कागदपत्रे नेल्याचे सांगितले जाते.
निकटवर्तियांचीच चाैकशी
देशमुख नागपुरात नसल्याचे माहित असूनही ईडी नागपुरात धडकली. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांचीच चाैकशी करायची असावी, असा तर्क लावला जात आहे.
राष्ट्रवादीची निदर्शने
महिन्याला १००कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपावरून आधी सीबीआय आणि आता महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीच्या पथकाने देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तियांची चाैकशी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यात खदखद निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, महिला नेत्या नूतन रेवतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशमुखांच्या निवासस्थानासमोर पोहचून भाजपा आणि केंद्र सरकारच्या ईशाऱ्यावरून चाैकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत जोरदार निर्दशने केली. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांच्या नावाने चांगलाच शिमगा केला.